सावधान; जिल्ह्यात डेंग्यू हातपाय पसरतोय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:33 AM2021-09-26T04:33:14+5:302021-09-26T04:33:14+5:30
नंदुरबार : जिल्ह्यात डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहादा आणि धडगाव या दोन तालुक्यांत डेंग्यूचे रुग्ण ...
नंदुरबार : जिल्ह्यात डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहादा आणि धडगाव या दोन तालुक्यांत डेंग्यूचे रुग्ण सातत्याने आढळून येत असल्याची माहिती असून त्यादृष्टीने आरोग्य विभागाकडून उपाययाेजना सुरू करण्यात आल्या आहेत. दरम्यान, राज्यात डेंग्यूचा व्हायरस बदलल्याचे सांगण्यात येत असताना नंदुरबारात मात्र जुनीच लक्षणे रुग्णांमध्ये आढळून येत आहेत. या रुग्णांची एलायझा टेस्ट केली जात आहे.
जिल्ह्यात जानेवारी ते ऑगस्ट या काळात हिवताप विभागाकडून एकूण ४६४ संशयित रुग्णांच्या एलायझा टेस्ट करण्यात आल्या होत्या. यातील ५४ जणांचे अहवाल हे पाॅझिटिव्ह आले होते. आजअखेरीसही जिल्ह्यात एकूण २७ जणांना डेंग्यूची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. एकीकडे हे उपचार सुरू असताना दुसरीकडे आरोग्य विभागाकडून जिल्ह्यात मोहीम हाती घेण्यात आली आहे. याअंतर्गत सर्व ठिकाणी फाॅगिंग, रुग्ण सर्वेक्षण करणे, बाधित रुग्णांच्या घरातील नागरिकांची तपासणी, तसेच कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. हिवताप कर्मचारी घरोघरी भेटीही देत आहेत.
अंगावर लाल पुरळ उठणे, डोकेदुखी, अंगदुखी ताप अशी डेंग्यूची लक्षणे असतात. ही लक्षणे दिसून आल्यानंतर नागरिकांनी तातडीने चाचण्या करून घेणे आवश्यक आहे. तीव्र डोकेदुखी व अंगदुखी अशी लक्षणे असली तरी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सर्वसाधारणपणे, प्लेटलेट्स कमी होण्याचे प्रमाण डेंग्यूच्या रुग्णांमध्ये दिसते. यामुळे त्यांची काळजी घेणे अधिक गरजेचे आहे. खासगी व सरकारी रुग्णालयांमध्ये प्लेटलेट्स कमी झालेल्या रुग्णांची विशेष काळजी घेतली जात आहे.
चाचण्या नियमित
डेंग्यूच्या व्हायरसमध्ये बदल झाल्याचा एकही रुग्ण जिल्ह्यात नाही. नियमित चाचण्या सुरू आहेत. संशयित रुग्ण आढळून आल्यावर उपचार करण्याचे आदेश दिले आहेत.
डॉ. अपर्णा पाटील,
जिल्हा हिवताप अधिकारी.
आरोग्य विभाग सज्ज.
जिल्ह्यात डेंग्यू निर्मूलनासाठी सर्व वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांना सूचना केल्या आहेत. पथकांची नियुक्ती केली आहे. रुग्ण आढळलेल्या परिसरात उपाययोजना केल्या जात आहेत.
-डॉ. महेंद्र चव्हाण,
जिल्हा हिवताप अधिकारी.