सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र दिवाळीनंतर होणार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:33 AM2021-09-25T04:33:00+5:302021-09-25T04:33:00+5:30
खेतिया येथे कापूस खरेदी गेल्या १५ दिवसांपासून सुरू झाली आहे. आजघडीस याठिकाणी ओल्या कापसाला ५ हजार ५०० रुपयांचा प्रतिक्विंटल ...
खेतिया येथे कापूस खरेदी गेल्या १५ दिवसांपासून सुरू झाली आहे. आजघडीस याठिकाणी ओल्या कापसाला ५ हजार ५०० रुपयांचा प्रतिक्विंटल दर देण्यात येत आहे. चांगला दर्जाचा कोरडा कापूस याठिकाणी थेट ८ हजार ५०० रुपयांना व्यापारी खरेदी करत आहेत.
नंदुरबार जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करणाऱ्या सीसीआयचा यंदाचा हमीभाव हा ५ हजार ९०० रुपये जाहीर झाला आहे. बाजारभावापेक्षा हमी कमी असल्याने शेतकरी यंदा बाजारभावानुसार कापूस विक्रीला प्राधान्य देण्याची अधिक शक्यता आहे. यातून खासगी चालक-मालक व परराज्यातील व्यापारी यांना लाभ होणार आहे. कापूस खरेदीसाठी बाजारात उतरणाऱ्या सीसीआयकडूनही दिवाळीनंतर हमीभावापेक्षा व्यावसायिक बाजार दरांप्रमाणे कापूस खरेदी करण्याची शक्यता असल्याची माहिती देण्यात आली आहे.
नंदुरबार तालुक्यातील पळाशी व शहादा अशा दोन केंद्रांवर सीसीआय नोव्हेंबर महिन्यात कापूस खरेदीसाठी येणार आहे.