आकडेमुक्त गाव संकल्पना अपयशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 11:19 AM2017-08-21T11:19:37+5:302017-08-21T11:20:08+5:30
तळोद्यात जनता दरबार : वीज वितरण कंपनीने गावागावात शिबिरे घेण्याची अपेक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : वीज वितरण कार्यालयाकडे वीज कनेक्शनसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून अर्ज दाखल करूनही अजूनपावेतो कार्यवाही केली नसल्याची तक्रार तालुक्यातील अनेक गावांमधील नागरिकांनी प्रत्यक्ष जनता दरबारात केली. त्यामुळे आकडेमुक्त गाव संकल्पना तालुक्यात तरी अपयशी ठरल्याचे चित्र आहे. वीज जोडण्यांसाठी अधिका:यांनी गावागावात कॅम्प आयोजित करण्याची मागणीही या वेळी ग्राहकांनी केली आहे.
येथील संत सावता माळी भवनात तालुक्यातील वीज समस्यांबाबत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी आमदार उदेसिंग पाडवी होते. याप्रसंगी वीज समस्यांबाबत नागरिकांनी पाढा वाचला. पिंपरपाडा, रतनपाडा, सोरापाडा, रोझवा पुनर्वसन, कालीबेल यासह अनेक गावांमधील ग्राहकांनी वीज कनेक्शनसाठी वीज वितरण कार्यालयाकडे गेल्या अनेक महिन्यांपासून अर्ज केलेला आहे. तथापि, त्यावर अजूनही कार्यवाही करण्यात आलेली नाही. याबाबत कार्यालयातदेखील पाठपुरावा केला आहे. तरीही कुणी लक्ष द्यायला तयार नाही, असा आरोपदेखील कुरेसिंग वळवी, लालसिंग वळवी, केलसिंग पावरा यांनी केला. नवीन कनेक्शन देण्यासाठी गावागावात अधिका:यांनी कॅम्प आयोजित करावे, अशी मागणीही या रहिवाशांनी केली. तातडीने कॅम्प आयोजित करण्याच्या सूचना शहादा विभागाचे अधीक्षक अभियंता धनंजय भामरे यांनी दिल्या. याशिवाय अनेक ठिकाणी नवीन ट्रान्सफार्मर, गंजलेल्या वीजतारा, खांब, नवीन खांब टाकण्याची मागणी या वेळी नागरिकांनी केली. तेव्हा उपअभियंता सचिन काळे यांनी निधी नसल्यामुळे ही कामे रखडली असून, यासाठी निधीची मागणी डीपीडीसीकडे केल्याचे सांगितले. तसेच काही ठिकाणी कर्मचा:यांअभावी गावक:यांना तांत्रिक बिघाडाचा सामना करावा लागत असतो. त्यामुळे कर्मचारी देण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय चुकीच्या रिडींगमुळे अव्वाच्या सव्वा वीज बिले येत असल्याचा तक्रारी ग्राहकांनी मोठय़ा प्रमाणावर केल्याबाबत संबंधित अधिका:यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले. या वेळी भामरे यांनी तातडीने रिडींगबाबत दुरूस्ती करून सुधारित बिले अदा करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर आमदार पाडवी यांनी वीज कनेक्शनसाठी तातडीने गावागावात मोहीम हाती घेवून ग्राहकांना मीटर उपलब्ध करून द्यावे. शिवाय नवीन ट्रान्सफार्मर, गंजलेले खांब, लोंबकळणा:या तारा व तांत्रिक बिघाडाबाबत ठोस कार्यवाही करण्याची सूचना दिली.
सूत्रसंचालन कौशल पाटील यांनी तर आभार मधुकर मराठे यांनी मानले. या जनता दरबारास शहादा विभागाचे अधीक्षक अभियंता धनंजय भामरे, उपअभियंता सचिन काळे, भाजपाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र राजपूत, नगरसेवक अजय परदेशी, विश्वनाथ कलाल, वीरसिंग पाडवी, भास्कर मराठे, संजय कलाल, दाज्या पावरा, अभियंता नीरजकुमार, अन्सारी, डॉ.स्वप्नील बैसाणे आदींसह सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, लाईनमन व नागरिक उपस्थित होते.