‘ब्लॅक स्पॉट’चा डाग मिटवण्यासाठी धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 12:32 PM2017-10-11T12:32:39+5:302017-10-11T12:32:39+5:30
रस्ते सुरक्षा समिती : जिल्ह्यातील दोन्ही अपघाती स्थळांसाठी 86 लाखांचा निधी प्रस्तावित
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सर्वोच्च न्यायालयाने गठीत केलेल्या समितीच्या निर्देशानुसार जिल्हास्तरीय रस्ते सुरक्षा समितीने विविध रस्त्यांवर सव्रेक्षण केल्यानंतर जिल्ह्यात दोन स्थळे ‘ब्लॅक स्पॉट’ अर्थात तीव्र अपघाती ठरवली आहेत़ दोन्ही अपघाती जागांवर उपाययोजना करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने अंदाजपत्रक तयार केले असून त्यासाठी निधीची मागणी केली आह़े
रस्ते अपघात कमी व्हावा यासाठी केंद्र, राज्य आणि जिल्हास्तरावर रस्ते सुरक्षा समित्या तयार करण्यात आल्या आहेत़ यात केंद्रीय स्तरावरून मिळालेल्या सूचनेनंतर 20 सप्टेंबर रोजी नंदुरबार जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे सदस्य पोलीस अधिक्षक संजय पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी दिपक पाटील आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता ए़एल़पवार यांनी केलेल्या सव्रेक्षणानंतर वावद ता़ नंदुरबार आणि कडवान ता़ नवापूर गावाजवळ ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले होत़े या निश्चितीनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने सात ऑक्टोबर रोजी धुळे येथील अधिक्षक अभियंता यांच्याकडे 86 लाख 15 हजार रूपयांच्या उपाययोजना करण्याबाबतचे अंदाजपत्रक पाठवून दिले आह़े येत्या 10 दिवसात या अंदाजपत्रकास मंजूरी मिळाल्यानंतर दोन्ही अपघात स्थळांवर उपाययोजना सुरू करण्यात येणार आहेत़