Vidhan Sabha 2019: चंद्रकांत रघुवंशी यांचा आज शिवसेनेत प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 01:13 PM2019-10-02T13:13:29+5:302019-10-02T13:14:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विधान परिषदेचे सदस्य व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी मंगळवारी आपल्या विधान परिषद ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : विधान परिषदेचे सदस्य व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी मंगळवारी आपल्या विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्याकडे दिला आहे. दरम्यान, बुधवारी ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
चंद्रकांत रघुवंशी हे 1992 पासून काँग्रेस पक्षात सक्रीय राजकारणात आले. त्यापूर्वी त्यांचे वडील स्व.बटेसिंग रघुवंशी हे काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते होते. ते 12 वर्षे विधान परिषदेचे सदस्य होते. चंद्रकांत रघुवंशी 1992 मध्ये जिल्हा परिषदेचे सदस्य होऊन धुळे व नंदुरबार जिल्हा एकत्रित असताना सहा वर्षे धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. त्यानंतर सलग तीनवेळा ते विधानपरिषदेचे सदस्य आहेत. त्यांची विद्यमान आमदारकीची मुदत एप्रिल 2020 मध्ये पूर्ण होत आहे. मात्र तत्पूर्वीच त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. सध्याच्या विधानसभा निवडणुका व त्याअनुषंगाने घडणा:या राजकीय घडामोडी लक्षात घेता त्यांनी हा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
मंगळवारी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला. या वेळी शिवसेनेचे सचिव मिलिंद नाव्रेकर व शिवसेना नेते सुभाष देसाई उपस्थित होते. या घटनेने जिल्ह्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून चंद्रकांत रघुवंशी यांच्या भूमिकेकडे जिल्ह्यातील राजकीय नेत्यांचे लक्ष होते. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत काँग्रेसच्या काही नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याचवेळी आमदार रघुवंशी यांच्या पक्षांतराची चर्चा रंगली होती. ते भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी सुरुवातीला चर्चा होती. पण ती चर्चा मागे पडली. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
आमदार रघुवंशी यांचा मुंबईत बुधवारी दुपारी दोन वाजता मातोश्रीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा होणार आहे. त्यांच्या समर्थक कार्यकत्र्याचा व विविध संस्थांमधील पदाधिका:यांचा प्रवेश नंदुरबार येथे स्वतंत्र मेळावा घेऊन करण्यात येणार आहे.
दरम्यान ‘लोकमत’शी बोलताना चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले की, बुधवारी मातोश्रीवर आपण शिवसेनेत प्रवेश करणार आहोत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होईल. शिवसेना पक्षप्रमुख देतील ती जबाबदारी स्वीकारून आगामी काळात शिवसेनेचे संघटन मजबूत करण्यासाठी काम करू. लवकरच नंदुरबारला शिवसेनेचा मेळावा घेऊन आपल्या समर्थकांचा प्रवेशही शिवसेनेत होणार आहे. त्यात नंदुरबार पालिकेच्या नगराध्यक्षांसह काँग्रेसचे सर्व नगरसेवक, साक्री नगरपंचायतीचे नगरसेवक, जि.प.चे माजी सभापती व सदस्य यासह बाजार समिती, शेतकी संघ, खरेदी-विक्री संघ तसेच विविध संस्थांचे पदाधिकारीही शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.