तापी काठावर साकारतेय ‘चेतक टेन्ट व्हीलेज’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 05:35 PM2017-12-01T17:35:59+5:302017-12-01T17:36:13+5:30
सारंगखेडा यात्रा : फेस्टीवलसाठी पर्यटन विभागाने केला 10 वर्षाचा करार
रमाकांत पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राज्यात घोडेबाजारासाठी प्रसिद्ध असलेली सारंगखेडा यात्रा आता ‘ग्लोबल फेयर’ रुप धारण करीत असून त्यासाठी पर्यटन विभाग सरसावला आहे. दरम्यान, या यात्रेनिमित्ताने खास ‘चेतक फेस्टीवल’ भरविण्यात येत असून त्यासाठी पर्यटन विभागाने 10 वर्षाचा करार करून निधीची तरतूद केली आहे. या फेस्टीवलनिमित्ताने येणा:या विविध राज्यातील व देशातील पर्यटकांसाठी खास तापी काठावर ‘चेतक टेन्ट व्हीलेज’ साकारत आहे.
सारंगखेडा येथील एकमुखी दत्ताची यात्रा सर्वदूर प्रसिद्ध आहे. त्यानिमित्ताने भरणारा घोडेबाजार हा देशातील पाचवा क्रमांकाचा बाजार म्हणून त्याची ओळख होते. या पाचव्या क्रमांकावरून आता पहिल्या क्रमांकावर भरारी घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने पुढाकार घेतला आहे. पर्यटनमंत्री जयकुमार रावल व स्थानिक प्रसाद सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा जि.प.चे माजी उपाध्यक्ष जयपाल रावल यांनी त्यासाठी धडपड सुरू केली आहे. गेल्या वर्षापासून चेतक फेस्टीवलला सुरुवात झाली आहे. यंदाही या फेस्टीवलला गेल्यावर्षाच्या तुलनेत व्यापक स्वरुप देण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी गेल्या आठवडय़ातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत बैठक घेऊन नियोजन केले आहे. 3 डिसेंबर 2017 ते 2 जानेवारी 2018 असा महिनाभर हा फेस्टीवल सुरू राहणार असून त्यासाठी महिनाभराकरिता वेगवेगळे कार्यक्रम आखण्यात आले आहेत. स्पर्धा, धार्मिक कार्यक्रम, घोडय़ांच्या शर्यती, मनोरंजनाचे कार्यक्रम विविध सेलेब्रिटींच्या उपस्थितीत होणार आहेत.
चेतक फेस्टीवलसाठी देशभरातील विविध अश्व शौकीनांना निमंत्रण देण्यात आल्याने अनेक व्हीआयपी येथे येण्याची शक्यता असल्याने त्यासाठी घोडाबाजार पाहण्याकरिता खास व्हीआयपी एसी गॅलरी घोडेबाजारात उभारण्यात येत आहे. शिवाय घोडय़ांबाबत आंतरराष्ट्रीय माहिती मिळावी यासाठी स्वतंत्र फोटो गॅलरी उभारण्यात आली आहे. रशियन महिला फोटोग्राफर कातिया डूझ यांना निमंत्रीत करण्यात आले आहे. या यात्रेला पूर्णपणे आंतरराष्ट्रीय लूक देण्यासाठी प्रयत्न होत असून त्यादृष्टीने काम सुरू आहे.
विशेष म्हणजे बाहेरून येणा:या व्हीआयपी पर्यटकांना राहण्यासाठी तापी काठावर खास टेन्ट व्हीलेज उभारण्यात येत आहे. जवळपास 70 पेक्षा अधिक व्हीआयपी टेन्ट येथे उभारण्यात येत असून त्यात सर्व अलिशान सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. याशिवाय याच व्हीलेज कॅम्पसमध्ये स्वतंत्र ओपन बार, स्पा सेंटर, डायनिंग हाऊस, रिसेप्शन हाऊस, क्लब यासह अनेक सुविधा राहणार आहेत. पर्यटकांच्या मनोरंजनासाठी बोटींग, स्पीडबोट, पॅरासेलींग, पॅराग्लाईडींग, अॅडव्हेंचर स्पोर्टस, हॉर्स राईडींग यासह अनेक सुविधाही राहणार असल्याने यंदाचा फेस्टीवल हा लक्षवेधी ठरणार आहे.