नंदुरबार रेल्वे स्थानकावर बालकाचा अपहरणाचा प्रयत्न फसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 01:03 PM2018-05-31T13:03:23+5:302018-05-31T13:03:23+5:30
संशयीत बिहारमधील रहिवाशी, गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : रेल्वेत चढतांना गर्दीचा फायदा घेवून एकाने तीन वर्षीय मुलाला पळवून नेण्याचा प्रय} केल्याची घटना नंदुरबार स्थानकावर सकाळी अकरा वाजता घडली. नातेवाईक आणि प्रवाशांनी प्रसंगावधान राखत पळवून नेणा:याला पकडून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उदयकुमार छोटूलाल दास (30) रा.नादियबा, ता.काकी, जि.जहानाबाद (बिहार) असे संशयीत आरोपीचे नाव आहे. पोलीस सूत्रांनुसार, नंदुरबार येथील व्यापारी कमलेश श्रीचंदलाल नानकाणी हे त्यांचे मोठे बंधू गिरीश नानकाणी, व तीन वर्षीय मुलासह बहिण व मेहुणे यांना सोडण्यासाठी रेल्वेस्थानकात आले. सकाळी 11 वाजता आलेल्या अजमेर-पुरी एक्सप्रेसमध्ये बहिण व मेहुणे यांना बसवितांना आणि त्यांचा सामान देतांना गर्दीचा फायदा घेवून आदित्य (वय तीन वर्ष) या बालकास उदयकुमार दास याने उचलून गर्दीतून पळू लागला. रेल्वेरूळ ओलांडून ते पटेलवाडीच्या दिशेने पळत असल्याची बाब कमलेश नानकाणी यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी या युवकाचा पाठलाग करून आरडाओरड केली. त्याचेळी तेथे असलेले इतर प्रवासी आणि डय़ुटीवरील पोलिसांनी उदयकुमार याला पकडले. बालकाला त्याच्या तावडीतून सोडून त्याला लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. कमलेश नानकाणी यांनी लोहमार्ग पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून उदयकुमार दास याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार घडल्यानंतर कमलेश नानकाणी यांनी सामाजिक कार्यकर्ते प्रकाशराय नानकाणी व इतर नातेवाईकांना कळविले. नातेवाईकांसह इतरजण रेल्वेस्थानकात धावले.
प्रकारामुळे खळबळ
गजबजलेल्या रेल्वे स्थानकातील या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. नानकाणी परिवाराचे वेळीच लक्ष गेल्याने मोठी दुर्घटना टळली. रेल्वे स्थानकात नेहमीच टारगट युवक आणि भुरटय़ा चोरांचा वावर असतो. रेल्वे पोलीस अशा युवकांना कधीही हटकत नाही. त्यामुळे अशा गुन्हेगारांचे फावले आहे.