शहरे लॉकडाऊन, खेड्यातील बाजारपेठा फुल्ल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 12:48 PM2020-07-25T12:48:32+5:302020-07-25T12:48:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील नंदुरबारसह शहादा, तळोदा व नवापूर हे चारही शहरे ३० जुलैपर्यंत लॉकडाऊन करण्यात आल्याने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील नंदुरबारसह शहादा, तळोदा व नवापूर हे चारही शहरे ३० जुलैपर्यंत लॉकडाऊन करण्यात आल्याने मोठ्या बाजारपेठांचे ठिकाण असलेल्या गावांमध्ये मात्र गर्दी वाढत आहे. विशेषत: म्हसावद, प्रकाशा, सारंगखेडा, बोरद, विसरवाडी येथे मध्यवर्ती बाजारपेठा असल्याने शहरी भागाकडे जाणारे अनेक ग्राहक या बाजारपेठांकडे वळले आहेत.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी चार प्रमुख शहरे २३ ते ३० जुलैपर्यंत पूर्णपणे लॉकडाऊन केले आहेत. या लॉकडाऊनची प्रभावीपणे अंमलबजावणी होत असल्याने या शहरांमध्ये रोज येणारे ग्राहक आपल्या कामासाठी आता ग्रामीण भागातील मध्यवर्ती बाजारपेठेकडे वळले आहेत. ग्रामीण भागातील बँकाही सुरू असल्याने बँकांच्या महत्त्वाच्या कामांसाठीही लोक खेड्यांवर जात आहेत. त्यामुळे खेड्यांमध्ये सध्या गर्दी वाढू लागली आहे.
सारंगखेड्यातील
बाजारपेठ फुलली
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हा प्रशासनाने नंदुरबार, शहादा, तळोदा व नवापूर या चार शहरांमध्ये आठ दिवसांसाठी कडक संचारबंदी लागू करण्याचे आदेश दिल्यानंतर या शहरातील व्यवसाय पूर्णत: बंद झाले आहेत. परिणामी दैनंदिन होणारे व्यवहार सध्या ग्रामीण भागाकडे वळत असल्याचे चित्र दोन दिवसात दिसून आले. सारंगखेडा हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने येथील बाजारपेठेत कुºहावद, कवठळ, बिलाडी, बामखेडा, ससदे, टेंबा, देऊर, खैरवे, कळंबू, अनरद, पुसनद, वरूळ कानडी आदी गावांचा दैनंदिन व्यवहारासाठी संपर्क येतो. शहादा शहरात आठ दिवसासाठी संपूर्ण संचारबंदी लागू केल्याने वरील सर्व गावातील ग्रामस्थ सारंगखेडा बाजारपेठेकडे वळले आहेत. भाजीपाला, कपडे, कीटकनाशके, खते, बियाणे त्याचबरोबर किराणा साहित्य आदी घेण्यासाठी या परिसरातील गावातील ग्रामस्थ सारंगखेडा बाजारपेठेला पसंती देतात. म्हणूनच गेल्या दोन दिवसापासून सारंगखेडा येथील बाजारपेठा फुलल्याचे चित्र दिसत असून व्यावसायिकांचे व्यवसाय बºयापैकी होत असल्याचे चित्र आहे. आदिवासी समाज बांधवांचे विवाह सुरू असल्याने व शहादा कडकडीत बंद असल्याने शहादा येथे होणारी खरेदी सारंगखेडा येथे होत आहे. लग्नाचा बस्ता, किराणा, भाजीपाला व इतर आवश्यक वस्तूंची खरेदी सारंगखेडा बाजारपेठेतून होत आहे. सारंगखेडा हे मुख्य रस्त्यावर असून येण्याजाण्यासाठीही सोयीचे असल्याने सुमारे २० ते २५ गावांचा सारंगखेड्याशी दररोज संबंध येतो. शहादा येथील बाजारपेठ आठ दिवसांसाठी बंद असल्याने परिणामी येथे होणारी कपड्यांची खरेदी व लग्नाचा बस्ता व इतर ग्राहक आमच्याकडे वळले असून काही प्रमाणात व्यवसाय नक्कीच वाढला असल्याची प्रतिक्रिया कापडाचे व्यापारी जयेश जैन यांनी ‘लोकमत’ला दिली.
गर्दी वाढल्याने
प्रकाशेकर धास्तावले
कोरोना विषाणूची साखळी तुटावी यासाठी नंदुरबार, शहादा, तळोदा व नवापूर शहरात संचारबंदी लागू केल्याने परिसरातील गावातील लोकांची प्रकाशा येथे खरेदीसाठी गर्दी होत आहे. प्रकाशा हे गाव नंदुरबार, शहादा व तळोदा तालुक्याच्या सीमेवर आहे. त्यामुळे या तिन्ही तालुक्यातील काही गावातील ग्रामस्थ प्रकाशा येथे दैनंदिन कामासाठी व बाजारहाटसाठी येतात. आता तर कोरोनाची साखळी तुटण्यासाठी नंदुरबार, तळोदा, शहादा व नवापूर येथे आठ दिवस पूर्णपणे संचारबंदी लागू केल्याने प्रकाशा गावाच्या परिसरातील गावातील ग्रामस्थांची बाजारहाटसाठी येथे गर्दी वाढली आहे. भाजीपाला, किराणा, फळे, हार्डवेअर व इतर सर्व कामांसाठी प्रकाशा येथे गर्दी होत आहे. येथे येणाºया बाहेरील काही लोकांच्या तोंडाला मास्क नाही व सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडत असल्याने प्रकाशा ग्रामस्थांमध्ये कोरोनाची भीती वाढली आहे. प्रकाशापासून पाच किलोमीटर अंतरावरील वैजाली येथे १७ वर्षीय तरुण कोरोना पॉझिटीव्ह आल्याने अधिक भीतीचे वातावरण तयार झाले आहे. कोरोनाची साखळी तुटावी यासाठी प्रकाशा येथेही तीन दिवस लॉकडाऊन केले आहे. २७ जुलैनंतरही सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवावी व नंतरचा वेळ पुन्हा लॉकडाऊन करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दोन दिवसापूर्वीच उपविभागीय पोलीस अधिकारी यांची प्रकाशा येथे बैठक झाली. श्रावण महिना, दशामाता मूर्ती विसर्जन पाहता प्रकाशा येथे कडकडीत बंद होणे गरजेचे आहे. म्हणून प्रशासनाने त्याची दखल घेत तीन दिवस लॉकडाऊन झाल्यानंतर ३१ जुलैपर्यंत अर्धा दिवस लॉकडाऊनची मागणी होत आहे.