आधारकार्ड अपडेटसाठी नागरिक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 01:31 PM2021-01-16T13:31:17+5:302021-01-16T13:31:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा:आधारकार्ड लिंकिंगच्या सर्व सुविधांसाठी शासनाने सक्ती केली असली तरी हे कार्ड अपडेट करण्यासाठी त्याच्यातील घोळ सुटता ...

Citizen harassment for Aadhaar card update | आधारकार्ड अपडेटसाठी नागरिक हैराण

आधारकार्ड अपडेटसाठी नागरिक हैराण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा:आधारकार्ड लिंकिंगच्या सर्व सुविधांसाठी शासनाने सक्ती केली असली तरी हे कार्ड अपडेट करण्यासाठी त्याच्यातील घोळ सुटता सुटत नसून सुविधा केंद्र संचालकदेखील दाद देत नसल्यामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. शासनाने यातून ठोस मार्ग काढावा, अशी मागणी आहे.
                विविध शासकीय योजनांच्या लाभाबरोबरच बँक खाते, पॅनकार्ड काढण्यासाठी आधार लिंकिंग व अपडेट करण्याची सक्ती नागरिकांना करण्यात आली आहे. तथापि, ते अपडेट करताना नागरिकांची मोठी दमछाक होत आहे. कारण त्यातील घोळ सुटता सुटत नसून नागरी सुविधा केंद्रांतील कर्मचारीदेखील दाद देत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कुणाच्या आधारकार्डात जन्मतारीख चुकीची झाली आहे तर कुणाच्या नावात बदल करण्यात आला आहे. या चुकांमुळे नागरिकांच्या कार्डात दुरुस्ती होत नाही. त्यातच सर्व्हर डाऊन व विजेचा लपंडाव यामुळे सेतू केंद्र संचालक नागरिकांना ‘उद्या या, परवा याद असे वायदे देत असतात. त्यामुळे त्यांनाही सतत हेलपाटे मारावे लागतात. 
विशेषत: ग्रामीण भागात शासनाचे सुविधा केंद्रे नाहीत त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या गावाहून तळोदा शहरात आधार अपडेटकरीता यावे लागत आहे. मात्र, इकडे काम होत नसल्याने त्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा  लागत आहे. त्यात त्यांचा वेळ व पैसा वाया जातो तरीही काम होत नाही. अशावेळी मनस्ताप सहन करावा लागतो. आधीच शासनाच्या फीव्यतिरिक्त अधिक चिरीमिरी      द्यावी लागते. तरीही काम होत नाही. त्यामुळे आधार अपडेटससाठी शासनाने नागरिकांची होत असलेली फजिती लक्षात घेऊन ठोस मार्ग काढावा, अशी नागरिकांची मागणी आहे. अन्यथा याविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

दुचाकी लावण्यावरुन होतात वाद
कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार लिंकींग करण्याची आवश्यकता असते. त्यासाठी नागरिकांना आपले आधार अपडेट्स करावे लागते.आधार अपडेट्स नसेल तर  बँक खाते उघडत नाही. शिवाय पॅनकार्ड सुध्दा मिळत नाही. परिणामी शासनाच्या योजनांपासून वंचित राहावे लागते. साहजिकच आधार लिकींग करावेच लागते. आधार कार्डमध्ये चुका झालेल्या असल्याने नागरिकांचीही सुविधा केंद्रांमध्ये गर्दी होते. शहरातील पालिकेच्या जुन्या इमारतीत सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. येथे नागरिकांची मोठी गर्दी होते. बाहेरून मोटारसायकलवर नागरिक येतात. तेथे दुचाकी लावण्यावरुन वाहनधारकांमध्ये वादविवाद होतात. तीन-चार दिवसांपूर्वी असाच प्रकार घडला होता. त्यावेळी काहींनी मध्यस्थी केल्यानंतर मोठे भांडण टळले. नागरी सुविधा केंद्रावर तासन्‌तास ताटकळत उभे राहावे लागत असल्याने असे वाद होतात.

माझ्या आधार कार्डात जन्म तारीख चुकीची झाली आहे. मी ७० वर्षाचा असताना कार्डात ४० वर्ष झाले आहे. त्यामुळे ते अपडेट्स होत नाही. परिणामी मला शासकीय योजनांपासूनही वंचित राहावे लागत आहे. त्याची दुरुस्ती करण्यासाठी सुविधा केंद्रात जातो तेव्हा केंद्रचालक दाद देत नाही. त्यासाठी सारखे हेलपाटे मारत आहे. मोठ्या रकमेची मागणी केली जाते. आता तर दुरुस्ती होणारच नाही, असे उत्तर मिळत आहे. त्यामुळे मनस्ताप होत असून प्रशासनाने यातून मार्ग काढावा.  -भास्कर ठाकरे, नागरिक, तळोदा.
 

Web Title: Citizen harassment for Aadhaar card update

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.