वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त : खेडदिगर येथील स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 12:19 PM2018-03-19T12:19:59+5:302018-03-19T12:19:59+5:30
आंतरराज्य मार्ग गावातून गेल्याने समस्या, उपाययोजनेची गरज
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 19 : शहादा तालुक्यातील खेडदिगर येथे आठवडे बाजार व इतर दिवशी वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. खेडदिगर गावाच्या बसथांब्याजवळ वाहने व नागरिकांची नेहमी गर्दी असते. गावातून आंतरराज्य मार्ग गेल्याने अवजड वाहनांची नेहमी वर्दळ असते. आठवडे बाजाराच्या दिवशी बसथांबा परिसरात दिवसभर वाहतुकीची कोंडी होते. याठिकाणची वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
खेडदिगर येथे शनिवारी आठवडे बाजार भरतो. यादिवशी इतर दिवसापेक्षा जास्त प्रमाणात गर्दी होते. परिसरातील गावातील नागरिक बाजारहाट करण्यासाठी शनिवारी मोठय़ा प्रमाणात येथे येतात. तसेच खेडदिगर गावातूनच आंतरराज्य महामार्ग गेल्याने अवजड वाहनांची नेहमी ये-जा सुरू असते. या वाहनांमुळे वाहतूक ठप्प होऊन इतर वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
आठवडे बाजाराच्या दिवशी ही समस्य दिवसभर जाणवते. वाहतूक ठप्प झाल्यानंतर वाहन पुढे काढण्याच्या वादातून वारंवार वादही निर्माण होतात. अवजड वाहनांसह ऊस वाहतूक करणारे ट्रक व ट्रॅक्टरची संख्या मोठी आहे. त्यातच हातगाडीवर वस्तू विक्री करणा:यांची गर्दी असते. रस्त्यावर आपल्या हातगाडय़ा लावून उभे राहत असल्याने वाहतुकीची समस्येत भर पडते. याठिकाणी पोलीस कर्मचारी नियुक्त केल्याचे सांगण्यात येते. मात्र याठिकाणी पोलीस कर्मचारी दिसून येत नाहीत. वाहतूक ठप्प झाल्यानंतर इतर लोकांना पुढाकार घेऊन वाहतूक सुरळीत करावी लागते. जर याठिकाणी पोलीस विभागाने कर्मचारी नियुक्त केले असतील तर त्यांनी दिवसभर थांबून वाहतूक सुरळीत राहण्यासाठी मदत करणे आवश्यक आहे. याठिकाणी कायमस्वरुपी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी व्यावसायिक व त्रस्त वाहनधारकांकडून होत आहे.