शहाद्यात सुरक्षेसाठी आता नागरिकांचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 12:39 PM2019-12-07T12:39:09+5:302019-12-07T12:39:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : दिवसेंदिवस शहरातील गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. सोनसाखळी चोरी, मोटारसायकल चोरी, घरफोडी असे अनेक गुन्हे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : दिवसेंदिवस शहरातील गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. सोनसाखळी चोरी, मोटारसायकल चोरी, घरफोडी असे अनेक गुन्हे शहादा शहरात घडत असल्याने हे वाढते गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांकडे मनुष्यबळ अपुरे पडत आहे. किती दिवस पोलिसांवर विसंबून राहायचे, आपली सुरक्षा आपणच करूया या सामाजिक बांधिलकीने शहरातील ब्रह्मसृष्टी कॉलनीतील नागरिकांनी एकत्र येत घर व परिसरावर नजर ठेवण्यासाठी सामूहिकरित्या सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित केले आहे.
शहादा शहरातील जुना मोहिदा रस्त्यावर ब्रह्मसृष्टी कॉलनी असून, या कॉलनीत ५२ बंगले आहेत़ शहरातील विविध कॉलनी पैकी एक ब्रह्मसृष्टी असून या कॉलनी गणेश उत्सव, नवरात्रोत्सव यासह विविध धार्मिक उत्सव, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येत असल्याने ही कॉलनी एक आदर्श म्हणून नावारूपाला आली आहे. या कॉलनीतील रहिवाशांना लग्नप्रसंग किंवा काही अपरिहार्य कारणांमुळे घराला कुलूप लावून बाहेरगावी जाण्याचा प्रसंग नेहमी येत असतो. कॉलनीला लागून जाणारा जुना मोहिदा रस्त्यावर शहरातील व कॉलनीतील नागरिक शतपावली करण्यासाठी दैनंदिन येत असतात.
या मार्गावर सायंकाळच्या दरम्यान सोनसाखळी पळविण्याच्या घटना घडल्या असून, युवतींची छेडखानी झाल्याच्या घटनादेखील घडलेल्या आहेत. त्याचप्रमाणे चोरटे हे अत्यंत चलाख व सफाईदार असल्याने घराचे कुलूप सहज तोडतात. परिणामी चोरीच्या घटना घडतात. घटना घडल्यावर फिर्याद, तपास आदी सोपस्कार सुरूच असतो. त्याचप्रमाणे इतरही ठिकाणी महिलांवरील अत्याचार, चोरीच्या घटना आदी बातम्या वृत्तपत्रातून झळकत असतात. हे सगळे वाचून येथील रहिवासी निवृत्त अभियंता जितेंद्र पाटील यांना कल्पना सूचली की, आपल्या कॉलनीपुरती का असेना सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित केली पाहिजे.
कॉलनीतील रहिवासी कामानिमित्त इतरत्र जात असतात. त्यामुळे दिवसभरातील सर्व घडामोडींवर सीसीटीव्ही कॅमेरातील फुटेजच्या माध्यमातून पोलिसांना तपासासाठी सहकार्य मिळत असून त्यांनी कॉलनीतील सगळ्या सहकाऱ्यांना बोलवून छोटेखानी बैठक घेत सीसीटीव्हीचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला सगळ्यांनी दुजोरा दिला. यात यथाशक्तीप्रमाणे सहकाऱ्यांनी सहभाग घ्यावा. कोणालाही सक्ती नसून उर्वरित खर्च स्वत: जितेंद्र पाटील यांनी केला.