केळी येथील नागरिकांना करावा लागतोय जीवघेणा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:36 AM2021-01-16T04:36:20+5:302021-01-16T04:36:20+5:30
तालुक्यातील भरडू येथे नागन प्रकल्प उभारण्यात आला आहे. पावसाळ्यात या धरणाचे पाणी ओव्हर फ्लो होत असते. त्यामुळे संपूर्ण पूल ...
तालुक्यातील भरडू येथे नागन प्रकल्प उभारण्यात आला आहे. पावसाळ्यात या धरणाचे पाणी ओव्हर फ्लो होत असते. त्यामुळे संपूर्ण पूल पाण्याखाली जातो. त्यामुळे दररोज येथील ग्रामस्थांना शेतात जाण्यासाठी व बाजारपेठेत जाण्यासाठी कंबरे एवढ्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागतो. याठिकाणी ग्रामस्थांच्या सुविधेसाठी मोठ्या पुलाचे काम सुरू आहे; मात्र गेल्या दोन वर्षांपासून प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे या पुलाचे काम अर्धवट राहिले आहे. या ठिकाणी सुरू असलेल्या पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
पुनर्वसित केवडीपाडा गावाला तीन किलोमीटर लांब मतदान केंद्रावर मतदानासाठी जावं लागत आहे. केवडीपाडा गावात मतदान केंद्र निर्माण करण्याची मागणीदेखील नागरिकांनी केली आहे. नागन प्रकल्पामुळे पुनर्वसन-केवडीपाडा गावाला पुनर्वसनामुळे मोठा फटका बसला आहे. २० वर्षांनंतरही अनेक नागरिकांना पुनर्वसनाचा मोबदला मिळालेला नाही. एकूणच केळी ग्रामपंचायतमधील नागरिकांना बाजाराच्या ठिकाणी व शेतात जाताना नागन प्रकल्पाच्या पाण्याखाली आलेल्या पुलावरून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. यावेळी मतदानाचा हक्क बजावताना नागरिकांनी होणाऱ्या अडचणी दूर करण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे.