पोलीस दलात आता सिटी मार्शल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 01:02 PM2017-09-28T13:02:19+5:302017-09-28T13:02:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरात कायदा व सुव्यवस्थेसाठी आता सिटी मार्शल योजना बुधवारपासून सुरू करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी दिली.
शहरात नेहमीच उद्भवणारे कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न तसेच शहरातील दाटीवाटीची वस्ती यामुळे पोलिसांच्या वेगवान हालचालींवर मर्यादा येतात. ही बाब लक्षात घेवून पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी सिटी मार्शल अर्थात मोटर सायकल पेट्रोलिंग योजना 27 सप्टेंबरपासून सुरू केली आहे. याअंतर्गत दोन मोटरसायकलींवर कमांडो गणवेशातील चार कर्मचारी राहतील. त्यांच्याकडे लाठी, हेल्मेट, वॉकीटॉकी तसेच व्हिडीओ शुटींगची सामुग्री घेवून रनिंग गुन्हे व कायदा व सुव्यवस्था प्रश्न होत असल्यास सिटी मार्शल त्वरीत घटनास्थळी जातील. तसेच सकाळी दहा ते रात्री दहा वाजेर्पयत सतत एकत्रितपणे पेट्रोलिंग करतील. नागरिकांनी काही घटना घडल्यास लागलीच नियंत्रण कक्षाला 210113 या क्रमांकावर कळविल्यास लागलीच मार्शल तेथे पोहचतील. शुभारंभ पोलीस अधीक्षक संजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अपर अधीक्षक प्रशांत वाघुंडे व अधिकारी उपस्थित होते.