सिव्हीलचे सिटी स्कॅन मशीन पडले बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 11:51 AM2020-10-03T11:51:13+5:302020-10-03T11:51:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ऐन कोरोनाच्या सर्वाधिक संक्रमनाच्या काळात जिल्हा रुग्णालयातील सीटी स्कॅन मशीन बंद पडल्याने रुग्णांना खाजगी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : ऐन कोरोनाच्या सर्वाधिक संक्रमनाच्या काळात जिल्हा रुग्णालयातील सीटी स्कॅन मशीन बंद पडल्याने रुग्णांना खाजगी ठिकाणी धाव घ्यावी लागत आहे. या मशीनचा जो पार्ट निकामी झाला आहे तो विदेशातून मागवावा लागत असल्यामुळे समस्या निर्माण झाली असून आणखी किमान आठ दिवस हे मशीन बंदच राहणार असल्याचे स्पष्ट आहे. यापूर्वीचे असलेले मशीन दुरूस्त करून ते पर्यायी स्वरूपात ठेवले असते तर आज सामान्य रुग्णांना आर्थिक भुर्दंड बसला नसता असे बोलले जात आहे.
कोरोनाचे निदान करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणी ही भरवशाची मानली जाते. परंतु लक्षणे नसलेल्या रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह तर लक्षणे असलेल्यांची चाचणी निगेटिव्ह येत असल्याने गोंधळही उडत आहे. त्यामुळे कोरोनाला घातक असलेला न्युमोनियाचा संसर्ग छातीत किती प्रमाणात झाला आहे त्याचे निदान करण्यासाठी छातीचा सीटी स्कॅन करून त्यानंतर उपचाराची दिशा ठरविली जाण्याची पद्धत रुढ झाली आहे. परिणामी छातीचा सीटी स्कॅन करणे अत्यावश्यक मानले जात आहे. जिल्हा रुग्णालयात दाखल रुग्णांना देखील छातीचा सीटी स्कॅन करून घ्यावा लागत आहे. परंतु गेल्या तीन दिवसांपासून येथील सीटी स्कॅन नादुरूस्त झाल्याने बंदच असल्याचे चित्र आहे.
सुरुवातीपासूनच ‘नाट’
सिव्हीलच्या सीटी स्कॅन सेंटरला सुरूवातीपासूनच नाट लागली आहे. आधी मशीन येत नव्हते. ते आले तर तंत्रज्ञ मिळत नव्हता. त्यामुळे तब्बल दोन ते अडीच वर्ष हे मशीन धूळखात पडून होते. जेमतेत तंत्रज्ञ मिळाला तर तो देखील आठवड्यातून दोन किंवा तीन दिवसच येत होता. पुर्णवेळ तंत्रज्ञ मिळाला आणि मशीन खराब झाले ते आजतागायत दुरूस्त होऊ शकले नाही. त्यानंतर तातडीने दुसरे मशीन खरेदी करण्यात आले. ते गेल्या चार ते सहा महिन्यापासून सुरळीत सुरू होते. परंतु तीन दिवसांपूर्वी एक महत्वाचा पार्ट नादूरस्त झाला आणि मशीन बंद पडले.
कोरोना संक्रमण ओळखण्यासाठी आवश्यक
कोरोनाचा किंवा न्युमोनियाचे छातीत किती प्रमाणात संक्रमण झाले आहे त्याचे निदान करण्यासाठी रुग्णाचा छातीचा सीटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला जातो. त्यात किती प्रमाणात संसर्ग आहे त्यावरून निदान व उपचार केले जातात. त्यामुळे कोरोना रुग्ण किंवा लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी सीटी स्कॅन किती आणि कशा प्रमाणात अत्यावश्यक आहे याची जाणीव होते.
आर्थिक भुर्दंड
जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना खाजगी सीटी स्कॅन सेटरमध्ये जाऊन जास्त पैसे मोजावे लागत आहे. पूर्वी खाजगी सीटी स्कॅन सेंटरमध्ये पाच ते सहा हजार रुपये आकारले जात होते. आता शासन निर्णयानुसार अडीच ते तीन हजार रुपये आकारले जात आहे. काही ठिकाणी हा दर लागू झाला आहे तर काही ठिकाणी तो लागू करण्यात आलेला नाही. रुग्णांना सिव्हीलमधून खाजगी सेंटरमध्ये जावे लागत असल्याचेही चित्र आहे.
एक्सरेवर निदान
सद्या सिव्हीलच्या बहुतांश रुग्णांना सीटी स्कॅन ऐवजी एक्सरे आणि इतर तपासणीच्या आधारावर उपचार केले जात आहेत. आॅक्सिजन लेव्हल, रक्ताच्या चाचण्या, एक्सरे याद्वारे निदान करून उपचार केले जात असल्याचे दिसून येत आहे.
तांत्रिक अडचणीमुळे सीटी स्कॅन बंद पडले आहे. संबधीत कंपनीच्या तंत्रज्ञाशी संपर्क साधण्यात आला असून निकामी झालेला पार्ट हा विदेशातून मागवावा लागणार आहे. त्यासाठी आणि किमान आठवडा लागणार आहे. यासाठी सातत्याने फोलोअप घेतला जात आहे.
-डॉ.के.डी.सातपुते, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक.