नंदुरबारातील चिराग गल्लीत दोन गटात हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 12:26 PM2018-03-17T12:26:58+5:302018-03-17T12:26:58+5:30
अश्रूधुराची नळकांडी फोडण्याचा इशारा देताच जमाव पांगला
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 17 : लहान मुलांच्या भांडणातून भिडलेले दोन गट ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे पाहून पोलिसांनी अश्रूधुराची नळकांडी फोडण्याचा इशारा देताच जमाव पांगल्याची घटना नंदुरबारातील चिराग गल्लीत गुरुवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी पोलिसांच्या फिर्यादीवरून जमावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनुसार, नंदुरबारातील चिराग गल्लीत गुरुवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास लहान मुलांच्या भांडणावरून दोन गट एकमेकांशी भिडले. दोन्ही गटाकडून दगड, विटांचा मारा सुरू झाला. तलवारीही काढण्यात आल्या. पोलिसांना ही माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक गुळींग व कर्मचारी घटनास्थळी पोहचले.
जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे पाहून अतिरिक्त पोलीस फोर्स मागविण्यात आला. तरीही जमाव एकमेकांवर दगड, विटांचा मारा करीतच होते. घटना हाताबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेता उपनिरीक्षक गुळींग यांनी अश्रूधुराच्या नळकांडय़ा फोडण्याचा इशारा दिला. तसे कर्मचा:यांना सज्जही केले. ते पहाताच जमाव लागलीच पांगला. पळून जाणा:या जमावातील काहींना पोलिसांनी ताब्यात घेतले.
यासंदर्भात शुक्रवारी पहाटे पोलीस नाईक अश्पाक शेख यांनी फिर्याद दिल्याने अजहरखान लियाकतखान, जुबेरखान, सोहेल लियाकतखान, ईलियाजखान सबदरखान, अजगर लियाकत खान, बबलू अश्पाक, जाकीरखान तुंबडूखान, साकीरखान व त्याच्या सोबत इतर दहा ते बारा जण, रफिक शेख अजिज मिस्तरी, फारूखशेख मिस्तरी, आसिफ शेख रफिकशेख व त्यांच्यासोबत दहा ते बारा जण यांच्याविरुद्ध दंगलीचा तसेच जिल्हाधिकारी लागू केलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार ए.एन.पाटील करीत आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण होते. चिराग गल्लीत दोन गट एकमेकांना भिडल्याने व दगड, विटा यांचा मारा आणि तलवारी चालल्याने परिसरात एकच धावपळ उडाली. परिसरातील नागरिकांनी घरे बंध करून घेतली. उपनिरीक्षक गुळींग हे मोजक्याच कर्मचा:यांसोबत घटनास्थळी पोहचल्यावर त्यांनाही जुमानले जात नव्हते. त्यांनी वायरलेसवर वाढीव फोर्स मागविला. त्यानंतर जमाव पांगला. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधीक्षक रमेश पवार, पोलीस निरीक्षक मथुरे, फौजदार ए.एन.पाटील यांनी भेट देवून पहाणी केली. रात्रभर वाढीव बंदोबस्त लावण्यात आला होता.