भादवड येथे वर्गखोल्यांचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 12:45 PM2019-06-26T12:45:31+5:302019-06-26T12:45:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या ‘विशेष प्रकल्प’अंतर्गत भादवड येथे जिल्हा परिषद शाळा खोल्यांचा लोकार्पण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या ‘विशेष प्रकल्प’अंतर्गत भादवड येथे जिल्हा परिषद शाळा खोल्यांचा लोकार्पण सोहळा जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्या हस्ते मंगळवारी झाला.
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातील मुख्यमंत्र्यांच्या एक हजार गावांच्या कायापालट कार्यक्रमात नंदुरबार जिल्ह्यातील 21 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. अभियानात समाविष्ट असलेल्या प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या एका महत्त्वाच्या गरजेचे प्रपोजल बनवून दिले. भादवड ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद शाळा वर्गखोल्यांचे बांधकाम करण्याचा प्रकल्प सादर केला होता. 11 लाख 50 हजार रुपये या प्रकल्पाची किंमत होती. त्यात ग्रामपंचायतीने एक लाख 50 हजार टाकायचे ठरविले व 10 लाख रुपयांचा निधी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाकडून उपलब्ध करून देण्यात आला. हा प्रकल्प कार्यारंभ आदेश दिल्यापासून तीन महिन्यात नऊ लाख 97 हजारात वर्गखोल्या बांधण्यात आल्या. या वर्गखोल्यांचा लोकार्पण सोहळा जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्या हस्ते पार पडला. या वेळी मंजुळे यांचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले. शाळेच्या आवारात हे रोपटे लावण्यात आले व त्याच्या संवर्धनाची जबाबदारी शाळेने घेतली. विशेष प्रकल्पाबद्दल माहिती देताना अभियानाच्या जिल्हा कार्यकारी अधिकारी अॅड.योगिनी खानोलकर यांनी ग्रामसेवक अशोक सूर्यवंशी, ग्रामपरिवर्तक अविनाश पाटील, सरपंच संजय वळवी, उपसरपंच ताईबाई नाईक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास वळवी व ग्रामस्थांनी जलद गतीने बांधकाम केल्याबद्दल कौतुक केले.
जिल्हाधिकारी मंजुळे म्हणाले की, ख:या अर्थाने गावामध्ये बदल घडवायचा असे तर त्याची सुरुवात शिक्षणाने करायला पाहिजे. या प्रकल्पाव्यतिरिक्त शाळेला नवीन मानकांप्रमाणे अतिरिक्त ज्या खोल्या लागतील त्या मंजूर करून देण्याची ग्वाही त्यांनी दिली.
सूत्रसंचालन जि.प. शाळेचे शिक्षक धीरज खैरनार यांनी केले. केंद्रप्रमुख तांबोळी यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास उपशिक्षणाधिकारी राहुल चौधरी, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, गटशिक्षणाधिकारी आर.बी. चौरे, विस्तार अधिकारी कुवर, नवापूर तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींचे ग्रामपरिवर्तक महेश जाधव, पंकज ठाकरे, बिजगावचे ग्रामविकास अधिकारी करोडीवाल आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी ग्रामपरिवर्तक अविनाश पाटील, मुख्याध्यापक गावीत, गांगुर्डे, गावीत, सूर्यवंशी, ग्रामविकास अधिकारी अशोक सूर्यवंशी आदींनी परिश्रम घेतले. जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी भादवड गावातून फेरफटकाही मारला. घरोघरी भिंतीवर चांगल्या प्रकारचा संदेश, स्वच्छतेचे त्यांनी कौतुक केले. जि.प. शाळेतील विद्याथ्र्याना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. निरुपयोगी इमारतीतून साकारलेल्या गावातील सार्वजनिक वाचनालय, टपाल कार्यालय व ग्राम संगणक कक्षालाही त्यांनी भेट दिली. राष्ट्रीय पेयजल योजनेतून सोलर पंपाद्वारे पाणीपुरवठा नळावरील पाण्याची चव घेऊन समाधान व्यक्त केले.