सिव्हिलच्या पार्किंगसाठी निश्चित जागी वाढू लागलेय व्यावसायिक अतीक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 12:58 PM2021-01-15T12:58:08+5:302021-01-15T12:58:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील अतीक्रमण गेल्या अनेक वर्षांपासून चिंतेचा विषय आहे. याठिकाणी रुग्णालयाने सहा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील अतीक्रमण गेल्या अनेक वर्षांपासून चिंतेचा विषय आहे. याठिकाणी रुग्णालयाने सहा वर्षांपूर्वी बाहेरुन येणा-यांची वाहने पार्किंगचा प्रस्ताव दिला होता. परंतू अतीक्रमणामुळे तो बारगळला आहे. यातून दुचाकींच्या गराड्यातून रुग्णवाहिका निघू शकत नसल्याने रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे.
नंदुरबार जिल्हा निर्मितीनंतर काही वर्षांत साक्री रस्त्यालगत विस्तीर्ण अशा मोकळ्या जागेवर जिल्हा रुग्णालय उभारण्यात आले आहे. जिल्ह्यातील शेकडो नागरीकांचा याठिकाणी राबता असल्याने या परिसरात इतर व्यवसायही सुरु झाले आहेत. दरम्यान गेल्या १० वर्षात या व्यावसायिकांनी रुग्णालयाचे मुख्य प्रवेशद्वारच काबीज केल्याचे दिसून आले आहे. याठिकाणी प्रामुख्याने रुग्णांच्या नातेवाईकांसाठी विविध खाद्यपदार्थ आणि इतर गरजेचे साहित्य याची विक्री करण्यात येते. यातून सकाळी आणि रात्री या दुकानांवर होणारी गर्दी इतर वाहनधारकांना त्रासदायक ठरत आहे. दुसरीकडे रुग्णालयात दर दिवशी २०० पेक्षा अधिक दुचाकी वाहने आणि ५० च्या जवळपास खाजगी चारचाकी वाहने येतात. ही वाहने थेट रुग्णालयाच्या पार्किंग लाॅटमध्ये जातात. यातून वाहतूकीची कोंडी होते. याच ठिकाणी जिल्हा रुग्णालयाने पार्किंग अर्थात वाहनतळ तयार करण्याचे नियोजन केले होते. तसे, पत्र सहा वर्षांपूर्वी बांधकाम विभागाला देण्यात आले होते. परंतू बांधकाम विभागाने त्याची दखल घेतली नाही. यानंतर आणखी एकवेळा याबाबत माहिती देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. परंतू त्यावरही योग्य ती कावाई झालेली नाही. दिवसेंदिवस याठिकाणी वाढती गर्दी, बाहेर उभ्या राहणा-या रिक्षा यामुळे वाहतूक कोंडी होवून रुग्णवाहिकांना अडसर निर्माण होत आहे. यातून येणा-या-जाणा-यांना अडचणीचे ठरत आहे.
- आपत्कालीन मार्ग बंद करुन दोन प्रवेशद्वारांचा होतोय वापर
- जिल्हा रुग्णालयातून बाहेर पडण्यासाठी आणि आत जाण्यासाठी दोन प्रवेशद्वार आहेत. परंतू बहुतांश रुग्णवाहिका ह्या मुख्य प्रवेशद्वाराने अपघात विभागाकडे जातात.
- कोरोना वाॅर्डकडे जाणा-या रुग्णवाहिका केवळ दुस-या प्रवेशद्वाराने जातात. येथील तिसरे प्रवेशद्वार मात्र रुग्णालय प्रशासनाने बंद ठेवले आहे.
- आतापर्यंत माॅकड्रील नाहीच
जिल्हा रुग्णालयातून बाहेर पडण्यासाठी तीन प्रवेशद्वारे आहेत. यातून आपत्कालीन स्थितीत बाहेर येण्यास जागा असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. यातून माॅकड्रील केलेले नाही. याउटल रुग्णवाहिकांना मार्ग व्हावा म्हणून सध्याचे वाहनतळ मोकळे करण्याचा निर्णय घेतला आहे.