नुकसानग्रस्तांना भरपाई द्या अन्यथा रास्ता रोको होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 01:43 PM2020-11-24T13:43:02+5:302020-11-24T13:43:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : निर्माणाधीन विसरवाडी ते सेंधवा महामार्गावरील कोळदे ते खेतिया रस्त्याचे काम धीम्या गतीने होत सुरू ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : निर्माणाधीन विसरवाडी ते सेंधवा महामार्गावरील कोळदे ते खेतिया रस्त्याचे काम धीम्या गतीने होत सुरू असून, अनेक ठिकाणी काम अपूर्ण असल्याने परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
या रस्त्यावर गेल्या तीन वर्षात अनेक अपघात झाले असल्याने मृत्यूचा सापळा ठरू पाहात आहे. तसेच परिसरातील शेतकऱ्यांनाही कोट्यावधी रूपयांच्या उत्पन्नाचे नुकसान होत असल्याने यातील दोषींवर कारवाई करण्यात येऊन नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात यावी अन्यथा २६ नोव्हेंबर रोजी प्रकाशा गावाजवळ रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रकाशा व परिसरातील शेतकरी, व्यापारी व नागरिकांनी लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विसरवाडी ते सेंधवा महामार्गाचे काम गेल्या तीन वर्षोपासून सुरू आहे. या दरम्यान काम करत असताना संबंधित ठेकेदार व खात्यातील अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे वाहनधारकांना रस्त्याच्या आजुबाजुला शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी गेल्या तीन वर्षात कोट्यवधी रूपयांचे शेती उत्पन्न खराब झाले आहे. कारण रस्ता काम करीत असताना धुळ उडते व ती धुळ शेतातील पिकांवर बसते व त्यामुळे पिकांची अन्यद्रव्य घेण्याची प्रक्रिया बंद होत असल्याने अपेक्षित उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत नाही. या रस्ता कामामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे व होत आहे? याला जबाबदार ठेकेदार व संबंधित खात्याचे अधिकारी आहेत. तसेच रस्त्याचे काम करत असताना पर्यायी रस्ता सुस्थितीत नसल्याने व ज्या ठिकाणी रस्त्याचे काम अपूर्ण आहे. त्या ठिकाणी मोठे खड्डे असल्याने आता पर्यंत तीन वर्षात असंख्य वाहन चालकांना अपघात होऊन आपला जीव गमवावा लागला आहे व अनेक जण अपंग, जखमी होत आहे.
संबंधितांना वेळोवेळी सूचना विनंती करूनदेखील काहीच उपाययोजना करत नाही. फक्त उडवाउडवीची भाषा वापरून वेळ काढूपणा करतात. म्हणुन आमची मागणी आहे की, अद्यापपर्यंत या रस्त्यावरील अपघातात जीव गमावलेल्या, जखमी आणि अपंग झालेल्या वाहनचालकांच्या व रस्त्याच्या आजुबाजुला शेतजमिनी असलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची संपूर्ण जबाबदारी ही ठेकेदार व संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांवर निश्चित करून वरील सर्व बाधितांना आर्थिक नुकसानभरपाई मिळावी व दोषींवर कायदेशीर कार्यवाही व्हावी आणि सदर रस्त्यांचे काम सुरू असल्याच्या काळात ज्या लोकांना अपघात होऊन जीव गमवावा लागला. त्याची जबाबदारी ही संबंधित ठेकेदारावर निश्चित करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व कायदेशीर कार्यवाही व्हावी. तसेच शहादा ते प्रकाशा व प्रकाशा ते नंदुरबार दरम्यानच्या अपूर्ण असलेल्या रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजून रस्ता सुस्थितीत पूर्ण करावा व गोमाई आणि तापी नदीवरील पुलावरचे खड्डे तत्काळ बुजावेत.
मागणीचे व रस्तादुरुस्तीचे काम चार दिवसात पूर्ण न झाल्यास २६ नोव्हेंबर २०२० रोजी या रस्त्यावर निषेध म्हणून प्रकाशा गावाजवळ रस्ता रोको आंदोलन करू. या दरम्यान जीही परिस्थिती उद्भवेल त्याला संपूर्ण जबाबदार संबंधित रहातील, असा इशारा ही देण्यात आला असून, निवेदनाच्या प्रती तहसीलदार, पोलीस निरिक्षक, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ नाशिक यांच्याकडे पाठविण्यात आल्या आहेत.