अतिवृष्टीने दिली दोन वर्षात २५ कोटींची भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2020 01:12 PM2020-12-10T13:12:50+5:302020-12-10T13:12:57+5:30

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :   दोन वर्षात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या तब्बल ३० हजारपेक्षा अधीक शेतकऱ्यांना २५ कोटीपेक्षा अधीकचे ...

Compensation of Rs. 25 crore in two years due to excess rainfall | अतिवृष्टीने दिली दोन वर्षात २५ कोटींची भरपाई

अतिवृष्टीने दिली दोन वर्षात २५ कोटींची भरपाई

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :   दोन वर्षात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या तब्बल ३० हजारपेक्षा अधीक शेतकऱ्यांना २५ कोटीपेक्षा अधीकचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. कोरोना काळापासून आतापर्यंत ही रक्कम वाटप झाली आहे. त्यामुळे कोरोना व लॅाकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, यंदाच्या अतिवृष्टीतील नुकसानीची रक्कम अद्यापही अनेक शेतकऱ्यांना मिळाली नसल्याची स्थिती आहे. 
गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधीक पाऊस होत आहे. पावसाळ्याच्या काही दिवसात काही भागात अतिवृष्टीची व संततधार पावसाची देखील नोंद होते. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकाच्या नुकसानीला सामोरे जावे लागते. त्याचे पंचनामे होणे, मदत मंजुर होणे, ती शेतकऱ्यांपर्यंत पोहचणे याला मोठा कालावधी लागतो.  असे असले तरी यंदा मात्र संकट काळात पिकांच्या नुकसानीची रक्कम मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. 
गेल्या दोन वर्षात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेत पिकाच्या नुकसानीबाबत शासनातर्फे कोरोनाच्या संकटकाळात मदतीचा हात दिल्याने बाधित शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत २५ कोटी रुपयापेक्षा अधिक मदतीचे वाटप करण्यात आले.
जुलै ते ऑक्टोबर २०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीबाबत १२ हजार १५० शेतकऱ्यांना १६ कोटी ५२ लाखाची मदत देण्यात आली. नंदुरबार तालुक्यात  दोन हजार ७५४ शेतकऱ्यांना ४ कोटी ६५ लाख रुपयांची रक्कम वाटप करण्यात आली. नवापूर एक हजार १३५ शेतकऱ्यांना ५३ लाख ६८ हजार रुपयांची नुकसान भरपाई, शहादा  तालुक्यातील तीन हजार ३६१ शेतकऱ्यांना सहा कोटी ९९ लाख रुपयांची रक्कम वाटप झाली. तळोदा तालुक्यात दोन हजार ६९९ शेतकऱ्यांना दोन कोटी ८३ लाख रुपयांची रक्कम देण्यात आली. अक्कलकुवा तालुक्यात एक हजार १०० शेतकऱ्यांना ९६ लाख ३४ हजार आणि धडगाव तालुक्यात एक हजार १०१ शेतकऱ्यांना ५४ लाख २८ हजार रुपयांच्या मदतीचे वाटप करण्यात आले. 
जुन ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीबाबत जिल्ह्यातील १६ हजार १२४ शेतकऱ्यांना आठ  कोटी ६० लाखाची मदत देण्यात आली. नंदुरबार तालुक्यात ४७२ शेतकऱ्यांना ३२ लाख पाच  हजार रुपये मदत, नवापूर तालुक्यातील चार हजार ८३६ शेतकऱ्यांना एक कोटी ५६ लाख रुपयांची रक्कम, शहादा तालुक्यातील एक हजार २९९ शेतकऱ्यांना ९० लाख ४८ हजार रुपयांची, तळोदा तालुक्यात ९०४ शेतकऱ्यांना ४४ लाख ७८ हजार रुपयांची, अक्कलकुवा तालुक्यात दोन हजार ३६४ शेतकऱ्यांना एक कोटी २८ लाख  आणि अक्राणी तालुक्यात सहा हजार २४९ शेतकऱ्यांना चार कोटी सात लाख रुपयांच्या  मदतीचे वाटप करण्यात आले.

९९ व ९० टक्के वाटपाचा दावा... 
 मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली. प्रशासनाने प्राप्त झालेली मदत तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी तालुका स्तरावर नियोजन केले होते.  
 २०१९ च्या मदतीपैकी ९९.७४ टक्के व २०२० च्या मदतीपैकी ९० टक्के रकमेचे वाटप करण्यात आले आहे. २०२० च्या उर्वरीत रक्कमेचे वाटपाची कार्यवाही तालुकास्तरावर सुरु आहे.

Web Title: Compensation of Rs. 25 crore in two years due to excess rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.