नंदुरबारातील मूलभूत सुविधांची कामे वेळेत पूर्ण करा : आदिवासी विभागाचे केंद्रीय सहसचिवांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 01:05 PM2017-12-03T13:05:42+5:302017-12-03T13:05:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील ग्रामीण भागात शासकीय यंत्रणांनी मूलभूत सुविधांची कामे योग्य कालावधीत पूर्ण करीत नागरिकांना सोयी-सुविधा पुरविण्याचे नियोजन करावे, असे निर्देश केंद्रीय आदिवासी विकास मंत्रालयाचे, सहसचिव राजेश अग्रवाल यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृहात जिल्ह्यातील विविध शासकीय यंत्रणांच्या विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत राजेश अग्रवाल यांनी विविध सूचना केल्या़ बैठकीस प्रभारी जिल्हाधिकारी अनिल पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एम. मोहन, सहाय्यक जिल्हाधिकारी निमा अरोरा, तळोदा प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी विनय गौड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा पुरवठा अधिकारी विजय भांगरे यांच्यासह विविध विभागातील विभाग प्रमुख उपस्थित होते.
सचिव अग्रवाल म्हणाले की, जिल्ह्यात विद्युतीकरण करून प्रत्येक शाळा, वसतीगृह, आश्रमशाळेत अखंडीत विद्युतपुरवठा करावा तसेच शेतीसाठी प्रत्येक गावात 24 तास वीज मिळेल असे नियोजन करावे. आरोग्य सुविधेसाठी दुर्गम भागात पुरेसे डॉक्टर, आशावर्कर असणे आवश्यक असून, जिल्ह्यात 100 टक्के लसीकरण करावे. रुग्णास 108 रुग्णवाहिकेची सेवा तत्काळ उपलब्ध व्हावी, प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रातच रुग्णास सर्व सुविधा मिळण्यासाठी आरोग्य केंद्रातील साधन सामुग्री अद्ययावत व सुस्थितीत ठेवाव्यात ज्यामुळे रुग्णास उपचारासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी येण्याची आवश्यकता भासणार नाही.