काँग्रेसला फुटीचे, तर भाजपला लागले बंडखोरीचे ग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 05:50 AM2019-07-11T05:50:27+5:302019-07-11T05:50:31+5:30
नंदुरबार जिल्ह्यातील चित्र : माणिकराव गावीत व सुरूपसिंग नाईक यांच्यातील मैत्रीत निर्माण झाला दुरावा
रमाकांत पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावीत यांचे पुत्र भरत गावीत यांनी भाजप प्रवेशाची वाट धरल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. तर भाजप आमदार उदेसिंग पाडवी यांच्या पुत्राने वडिलांविरोधात बंडखोरीची तयारी चालविल्याने भाजपमध्येही चलबिचल सुरू झाली आहे.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने अक्कलकुवाचे आमदार अॅड. के. सी. पाडवी यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे नाराज झालेले भरत गावीत यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असून ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अॅड. के. सी. पाडवी हे सलग सहावेळा आमदार म्हणून निवडून आले होते. परंतु लोकसभेत पराभूत झाल्याने सध्या ते आपल्या पराभवाच्या चिंतनातच आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया झाल्याने त्यातून ते सावरण्याचा प्रयत्न करीत आहेत. माजी मंत्री अॅड. पद्माकर वळवी यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे एकूणच काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरुपसिंग नाईक हे वृद्धापकाळामुळे निवडणूक लढण्याची शक्यता कमी आहे. त्यांच्याऐवजी त्यांचे पुत्र शिरीष नाईक हे निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.
भाजपमध्ये देखील सर्वकाही आलबेल नाही. या पक्षात येणाऱ्यांची संख्या वाढत असली तरी बंडखोरी आणि मतभेदामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. पक्षात जुने कार्यकर्ते व नवे कार्यकर्ते असा वाद वाढल्याने पक्षाने जिल्हाध्यक्ष बदलला आहे. यापूर्वी खासदार डॉ. हीना गावीत यांच्याकडे जिल्हाध्यक्षपद होते. ते आता भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांच्याकडे देण्यात आले आहे.
आमदार उदेसिंग पाडवी यांचे पुत्र राजेश पाडवी यांनी शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघात भाजपकडे उमेदवारी मागितली आहे. अर्थातच त्यांचे वडील उदेसिंग पाडवी यांच्या विरोधातच त्यांनी उमेदवारीची इच्छा दर्शवल्याने तो चर्चेचा विषय झाला आहे. नंदुरबारमधून डॉ.विजयकुमार गावीत यांच्याविरोधात अनेक जण इच्छुक आहेत. नवापूरमध्ये भरत गावीत यांच्या प्रवेशाने पक्षाची
स्थिती मजबूत होणार असली तरी याठिकाणी देखील काँग्रेसचे आव्हान राहणारच आहे.
आघाडी आणि युती झाल्याने शिवसेना आणि राष्टÑवादी काँग्रेसला जागा वाटपात सांभाळून घेणे ही सर्वात मोठी डोकेदुखी काँग्रेस आणि भाजपपुढे आहे. कारण राष्टÑवादीनेही शहादा, नवापूर व अक्कलकुवा याठिकाणी दावा सांगितला आहे. तर शिवसेनेने नंदुरबार आणि अक्कलकुव्यात तयारी सुरू केली आहे. त्यामुळे जागा वाटपात कुठली जागा कोणत्या पक्षाकडे जाते हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे.
दोन ज्येष्ठ नेत्यांमध्ये मतभेद
आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील राजकारणात नवा रंग पहायला मिळणार आहे आणि तो म्हणजे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरुपसिंग नाईक व माणिकराव गावीत यांच्यातील दुरावा! गेल्या पाच दशकांपासून जिल्ह्यातील राजकारणात या दोन्ही नेत्यांची चलती होती. त्यांचा मोठा प्रभाव कार्यकर्त्यांवर होता.
दोन्ही नेत्यांची गांधी घराण्याशी जवळीक होती. मात्र यावेळी प्रथमच त्यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. माणिकराव गावीत यांचे पुत्र भरत गावीत यांनी सुरुपसिंग नाईक यांच्यावर आरोप करीत भाजपची वाट धरली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत प्रथमच हे ज्येष्ठ नेते एकमेकांच्या विरोधात राहण्याची शक्यता आहे.