मुलगा अन् पतीकडून सततचा त्रास, अखेर महिलेने घेतला गळफास
By भूषण.विजय.रामराजे | Updated: August 29, 2023 19:01 IST2023-08-29T19:01:07+5:302023-08-29T19:01:18+5:30
कांतीबाई ब्रिजलाल वळवी (४५) रा. चांदसैली माळ असे मयत महिलेचे नाव आहे.

मुलगा अन् पतीकडून सततचा त्रास, अखेर महिलेने घेतला गळफास
नंदुरबार: धडगाव तालुक्यातील चांदसैली माळ येथे महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती आणि मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २५ राेजी दुपारी महिलेने पती आणि मुलाकडून सतत होणाऱ्याला त्रासाला कंटाळून घरात गळफास घेत आत्महत्या केली होती.
कांतीबाई ब्रिजलाल वळवी (४५) रा. चांदसैली माळ असे मयत महिलेचे नाव आहे. कांतीबाई यांचा पती ब्रिजलाल वळवी (५०) हा वर्षभरापासून दुसरा विवाह करावयाचा असल्याने छळ करत होता. पत्नी कांतीबाई हिने घर सोडून निघून जावे, असे त्याचे म्हणणे होते. दरम्यान, मुलगा सोहम (२५) हादेखील महिलेला त्रास देत होता. यातून पती आणि मुलाकडून होणाऱ्या छळाला कंटाळून कांतीबाई वळवी यांनी २५ ऑगस्ट रोजी आत्महत्या केली होती.
दरम्यान, याप्रकरणी नटवर दामजी वसावे यांनी धडगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित ब्रिजलाल सेंदा वळवी (५०) आणि सोहम ब्रिजलाल वळवी (२५) दोघे रा. चांदसैली माळ यांच्याविरोधात मयत कांतीबाई यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक राहुल पाटील करत आहेत.