Vidhan Sabha 2019 : तीन वेळा मतदारसंघ पुनर्रचनेत सिमांकनासह प्रवर्गही बदलले..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2019 11:41 AM2019-10-03T11:41:54+5:302019-10-03T11:43:19+5:30

  मनोज शेलार ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : 1962 पासून आतार्पयत झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये तीन वेळा मतदारसंघांची पुनर्रचना ...

The constituency also changed with the delimitation of constituencies in three constituencies. | Vidhan Sabha 2019 : तीन वेळा मतदारसंघ पुनर्रचनेत सिमांकनासह प्रवर्गही बदलले..

Vidhan Sabha 2019 : तीन वेळा मतदारसंघ पुनर्रचनेत सिमांकनासह प्रवर्गही बदलले..

googlenewsNext

 

मनोज शेलार । 
लोकमत न्यूज नेटवर्क

नंदुरबार : 1962 पासून आतार्पयत झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये तीन वेळा मतदारसंघांची पुनर्रचना केली गेली. सुरुवातीला संयुक्त धुळे जिल्ह्यात नंदुरबार विभागात चार मतदारसंघ होते. त्यानंतर 1972 मध्ये पुनर्रचना होऊन नंदुरबार विभागात पाच मतदारसंघ झाले. जिल्हानिर्मितीनंतर अर्थात 2009 च्या निवडणुकीत पुन्हा पुनर्रचना होऊन चार मतदासंघ झाले. सर्वच चारही मतदारसंघ अर्थात एस.टी.प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले.
विधानसभा मतदारसंघांची व्याप्ती, त्यांचे सिमांकन, मतदार संख्या याबाबत सामान्य मतदारांना मोठी उत्सूकता असते.  
1962 ची पहिली निवडणूक
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर 1962 मध्ये पहिली निवडणूक लागली. त्यावेळी मतदार संघ रचना करतांना पश्चिम खान्देश या जिल्ह्यात नंदुरबार विभागात चार मतदारसंघ होते. त्यात नंदुरबार, नवापूर, तळोदा आणि अक्राणी. चारपैकी नंदुरबार मतदारसंघ खुल्या प्रवर्गासाठी तर इतर तिन्ही एस.टी.प्रवर्गासाठी राखीव होते. मतदार संघांचे सिमांकन ठरवितांना नवापूर मतदारसंघाला साक्री तालुक्याचा आदिवासी पट्टा जोडला गेला होता. नंदुरबार मतदारसंघ पुर्ण तालुक्याचा आणि शहादा तालुक्याचा तापी पट्टयाचा भाग जोडलेला होता. तळोदा मतदारसंघात तळोदा व अक्कलकुवा तालुक्यांचा तर अक्राणी मतदारसंघात संपुर्ण अक्राणी तालुका आणि शहादा तालुक्याचा सातपुडय़ाच्या पायथ्याशी असलेला  काही भाग जोडला होता. 1962 आणि 1967 ची निवडणूक याच रचनेप्रमाणे झाली. परंतु नंदुरबार मतदारसंघ हा सर्वसाधारण ऐवजी एस.टी.राखीव झाला.
1978 मध्ये पुनर्रचना
1978 मध्ये पुन्हा मतदारसंघांची पुनर्रचना करण्यात आली. या पुनर्रचनेत चार ऐवजी पाच मतदारसंघ नंदुरबार विभागात झाले. त्यात नवापूर मतदार संघांची रचना कायम ठेवण्यात आली. नंदुरबार मतदारसंघ संपुर्ण तालुक्याचा केला गेला. तळोदा मतदारसंघ तळोदा व अक्कलकुवा या दोन तालुक्यांचा कायम ठेवण्यात आला. धडगाव मतदारसंघ धडगाव तालुका आणि शहादा तालुक्यातील तीन महसूल मंडळांचा समावेश असलेला झाला तर नव्याने निर्माण झालेला शहादा मतदारसंघ शहादा तालुक्यातील तापी पट्टयाचा भागातील चार महसूल मंडळ आणि शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचासह तीन महसूल मंडळांचा बनला. यामुळे शहादा मतदारसंघ सर्वसाधारण झाला तर नंदुरबार मतदारसंघ एस.टी.राखीव झाला. साधारणत: सात निवडणुका याच रचनेनुसार झाल्या. 1978, 1980, 1985, 1990, 1995, 1999 व 2004 या निवडणुकांचा समावेश होता. 
पुन्हा चार मतदारसंघ
2004 च्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा मतदारसंघांची पुनर्रचना करण्याचे ठरविण्यात आले. यावेळी अर्थात 1998 साली नंदुरबार जिल्हा धुळे जिल्ह्यातून स्वतंत्र झालेला होता. त्यामुळे धुळे जिल्ह्यातील गावे वगळण्याचा निर्णय त्यासाठी घेण्यात आला. अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार व नवापूर हे चार नवीन मतदारसंघ अस्तित्वात आले. चारही मतदारसंघ एस.टी.प्रवर्गासाठी राखीव झाले. दोन तालुक्यांचा एक मतदारसंघ अशी रचना त्यात राहिली. नंदुरबार मतदारसंघ सर्वसाधारण राहील अशी शक्यता असतांना तो राखीव झाला. 

असे आहेत मतदारसंघ..
अक्कलकुवा : या मतदारसंघात संपुर्ण अक्कलकुवा व धडगाव तालुक्याचा समावेश.
शहादा : मतदारसंघात संपुर्ण तळोदा तालुक्यासह शहादा तालुक्यातील म्हसावद, ब्राम्हणपुरी, असलोद, शहादा महसूल मंडळासह शहादा शहराचा समावेश.
नंदुरबार : मतदारसंघात नंदुरबार शहरासह नंदुरबार, रनाळे, खोंडामळी कोरीट महसूल मंडळे तसेच शहादा तालुक्यातील कलसाडी, प्रकाशा, सारंगखेडा, वडाळी महसूल मंडळांचा समावेश आहे. 
नवापूर : मतदारसंघात संपुर्ण नवापूर तालुका आणि नंदुरबार तालुक्यातील धानोरा व आष्टे महसूल मंडळाचा समावेश.
 

Web Title: The constituency also changed with the delimitation of constituencies in three constituencies.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.