डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेऊनच करावे लागते कंट्रोलला काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 12:29 PM2021-01-14T12:29:12+5:302021-01-14T12:29:21+5:30
मनोज शेलार लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कंट्रोलरूम मध्ये दररोज शेकडो कॅाल स्विकारतांना डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवावी ...
मनोज शेलार
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कंट्रोलरूम मध्ये दररोज शेकडो कॅाल स्विकारतांना डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवावी लागते. कॅाल करणारे काही वेळा खरंच गरजवंत असतात तर काहीजण निव्वळ फेक कॅाल करतात. अशा वेळी संताप येतो, परंतु त्यावर नियंत्रण ठेऊन काम करावे लागत असल्याचा अनुभव पोलीस कंट्रोलरूम मध्ये १०० नंबरचे कॅाल हाताळणारे हवालदार संजय सावळे यांनी सांगितला.
सार्वजनिक क्षेत्रात विशेषत: पोलीस दलात काम करतांना अनेक ताणतणाव, प्रश्न व समस्यांना सामोरे जावे लागत आपले कर्तव्य पार पाडावे लागते. त्यात दररोज अनेकांशी फोनद्वारे संपर्क येणारा विभाग म्हणजे कंट्रोल रूम. या कंट्रोल रूममधील १०० क्रमांकावर दररोज अनेकांचे फोन येतात. कधी कुणा गरजवंताला मदत लागते, कुठे आग लागलेेली असते, कुठेे अपघात झालेला असतो तर कुठे चोरी असे विविध प्रकारचे फोन आल्यावर त्यांच्याकडून सर्व माहिती शांततेने ऐकुण घ्यावी लागते. ज्यांनी फोन केला ते कुठे आहेत, त्यांना कशा प्रकारची मदत हवी आहे. नेमके त्यांचे लोकशेन कुठे आहे. त्यांच्या जवळचे पोलीस ठाणे, दूरक्षेत्र पोलीस ठाणे कोणते आहे याची पडताळणी करून संबधीतांना लागलीच मदत मिळूवन देण्यासाठी तत्परता दाखवावी लागते. लागलीच दखल घेतली गेल्याने अनेकांचे जीव वाचले, अनेकांना वेळेवर मदत मिळाल्याचे संजय सावळे यांनी सांगितले. कंट्रोल रुममधील सर्वच कर्मचारी हे संवेदनशील असतात.
फेक कॅालची समस्या वाढली
सद्या कंट्रोल रूममध्ये अर्थात १०० क्रमांकावर फेक कॅालचे प्रमाण वाढले आहे. कुणीही कुणाचा काटा काढणे, मजाक करणे यासाठी खोटी माहिती देतात. यामुळे पोलिसांचा वेळ वाया जातो, शिवाय गरजवंताला मदत करण्यास विलंब होतो. अशा वेळी आलेला राग गिळावा लागतो.
कंट्रोल रूमकडे महिला, मुलींकडून करण्यात येणार कॅाल देखील वाढले आहेत. कुणी त्रास देत असेल, घरगुती भांडण असेल, सार्वजनिक ठिकाणी त्रासाचा प्रकार असेल तर महिला आता धिटपणे कॅाल करतात. अशा कॅालची लागलीच दखल घेऊन संबधीतांना सुचना दिली जाते. दररोज दैनंदिन काम करतांना येथील कर्मचारी यांना कान व डोळे नेहमीच सतर्क ठेवावे लागतात.
कंट्रोल रूमला दररोज म्हणजे २४ तासात साधारणत: ८० ते १०० कॅाल येतात. सर्वच कॅाल हे विविध विषयांचे असतात. सर्वाधिक मदतीचे तर काही कॅाल हे माहिती देणारे असतात. शासनाची ही सुविधा चांगली असून त्याचा योग्य वापर करावा अशी अपेक्षा कंट्रोलचे पोलीस निरिक्षक सुनील नंदवाळकर व कर्मचारी संजय सावळे यांनी सांगितले.