शेतांचे नदी-नाल्यात रुपांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 01:03 PM2019-08-12T13:03:53+5:302019-08-12T13:03:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क परिवर्धे : परिसरातील शेतांमध्ये वाकी नदीच्या पुराचे पाणी शिरल्याने केळी, पपई, ऊसासह इतर पिकांसह शेती वाहून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
परिवर्धे : परिसरातील शेतांमध्ये वाकी नदीच्या पुराचे पाणी शिरल्याने केळी, पपई, ऊसासह इतर पिकांसह शेती वाहून गेल्याने शेतक:यांचे प्रचंड नुकसान झाले. नदीतील गाळ व वाळू घुसल्याने शेतांचे नदी-नाल्यात रुपांतर झाले आहे.
अतिवृष्टी व महापुराने शहादा तालुक्यातील परिवर्धे, कोठली, त:हाडी, कलसाडी, सोनवल, जावदा, वाडी पुर्नवसन, कलमाडी आदी गावांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाकी नदीला आलेला महापुराने कोठली व परिवर्धे गावाला चोहोबाजूंनी वेढा दिला असून शेकडो हेक्टरवरील पिके जमीनदोस्त झाली आहेत. अनेक घरांची पडझड झाली. पुराचे पाणी गावात घुसल्याने कोठली ग्रामस्थांनी त:हाडी गावात आसरा घेतला. वाकी नदीचा उगम धडगाव रस्त्यावरील नणंद-भावजयी घाटापासून आहे. नदीच्या उगम क्षेत्रात प्रचंड पाऊस झाल्याने नदीला महापूर आला होता. हा महापूर 2006 पेक्षाही भयानक होता. नदीजवळील शेतातील पपई, ऊस, कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी आदी पिके वाहून गेल्याने मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी नदीने वेगळेच वळण घेतल्याने वाघोदा ते परिवर्धा, परिवर्धा ते कोठली रस्ता वाहून गेला. सपाट शेतजमिनींचे नाल्यात रुपांतर झाले आहे. परिसरात खंडित झालेला वीजपुरवठा शनिवारी रात्रीर्पयत सुरळीत होईल, असे सांगण्यात आले.
दरम्यान, शनिवारी येथे नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे करण्यासाठी तलाठी व ग्रामसेवक आले असता गामस्थांनी त्यांना पंचनामे करु दिले नाही. ज्यांनी अवैध जागेवर घर बांधलेले आहे त्यांचेही पंचनामे शासनाने करावे, अशी मागणी करण्यात आली.
आमदारांकडून पाहणी
शहादा तालुक्यातील परिवर्षे, त:हाडी, सोनवल इतर शिवारात पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी रविवारी कृषी अधिकारी किशोर हडपे व कृषी सहायक धनराज निकुंभे आदींनी केली. शासनाने शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी संबंधित विभागांच्या सुटय़ाही रद्द करण्यात आल्या आहेत. प्रत्यक्ष नुकसानीचा अंदाज शासनाला कळवावा लागणार असल्याने रविवारी कृषी अधिकारी यांनी या भागात पाहणी केली. संध्याकाळी आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनीही परिवर्धे व कोठली गावातील नुकसानीची पाहणी केली. वाकी नदीवरील वाहून गेलेली संरक्षण भिंत, विजेचे खांब आदींचीही पाहणी केली. कोठली गावाचे इतरत्र पुनर्वसन करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.