गुजरातमधून येणाऱ्या प्रवाशांची होणार कोरोना तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 11:58 AM2020-11-25T11:58:53+5:302020-11-25T11:59:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात रेल्वे व रस्ते मार्गाने येणाऱ्या प्रवाशाची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात रेल्वे व रस्ते मार्गाने येणाऱ्या प्रवाशाची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिले आहे.
रेल्वे वाहतूक मार्गे येणाऱ्या राष्ट्रीय राजधानी दिल्ली, राजस्थान, गुजरात व गोवा या राज्यातून येणाऱ्या, थांबा असणाऱ्या रेल्वेतून नंदुरबार तसेच नवापूर रेल्वे स्थानकावर उतरणाऱ्या प्रवाशांकडे आरटीपीसीआर चाचणीचे निगेटिव्ह अहवाल सोबत असणे बंधनकारक राहील. ९६ तास आधी चाचणीचे नमुने घेणे आवश्यक असेल. नंदुरबार व नवापूर रेल्वे स्टेशनवर उतरणाऱ्या ज्या प्रवाशांकडे आरटीपीसीआर चाचणीचे निगेटीव्ह रिपोर्ट नसतील अशा प्रवाशांची तपासणी करण्यात यावी. दिल्ली, राजस्थान, गुजरात व गोवा राज्यातून रस्ते मार्गे जिल्ह्यात येणाऱ्याची कोविड-१९ लक्षणे व शरीराचे तापमान तपासणी करण्यात यावी. ज्या प्रवाशांना लक्षणे नसतील अशाच प्रवाशांना जिल्ह्यात प्रवेश करण्यास मुभा असेल. लक्षणे आढळून आल्यास प्रवाशांना विलग करुन ॲन्टीजन चाचणी करण्यात येईल. अहवाल निगेटिव्ह आल्यास अशानाच पुढे प्रवास करण्यास मुभा असेल. रेल्वे व रस्ते मार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्यास त्यांना त्वरीत उपचारासाठी कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे. होणारा खर्च प्रवाशांनी करावयाचा आहे.