नवापूर व विसरवाडीत कोरोनाचे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 12:18 PM2020-07-15T12:18:06+5:302020-07-15T12:18:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : एकाच दिवशी नवापूर शहरात दोन व विसरवाडी येथील एक असे तीन जण कोरोना पॉझिटीव्ह ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : एकाच दिवशी नवापूर शहरात दोन व विसरवाडी येथील एक असे तीन जण कोरोना पॉझिटीव्ह तर एका संशयितास तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. ट्रॅव्हल हिस्ट्रीची पार्श्वभूमी असलेले हे रुग्ण असल्याने बाहेरगावी जाणे शक्यतो टाळावे, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.
शहरातील मंगलदास पार्क भागातील ६५ वर्षीय वृद्धा व जनता पार्कमधील ५५ वर्षीय पुरुष कोरोनावर मात करुन एक दिवसाआधीच शहरात दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी वाजविण्यात आलेल्या टाळ्यांची गुंज शांत होत नाही तोवर मुस्लीम मोहल्ल्यातील २८ वर्षीय महिला व शितल सोसायटीमधील ६७ वर्षीय वृद्ध कोरोना पॉझिटीव्ह झाल्याची वार्ता शहरात धडकली. पैकी महिला व्यारा येथे व वृद्ध सुरत येथे तपासणीसाठी गेले असल्याने त्यांना तेथेच दाखल करुन घेण्यात आले आहे. शितल सोसायटीमधील ५२ वर्षीय इसमात कोरोना सदृश्य लक्षणे दिसून आल्याने तातडीने त्यास उपजिल्हा रुग्णालय व तेथून जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. विसरवाडी येथील ५२ वर्षीय महिलेचाही अहवाल मंगळवारी कोरोना पॉझिटीव्ह आल्याने तालुक्याचा कोरोना पॉझिटीव्हचा आकडा सहावर पोहोचला आहे. पैकी तीन जण तंदुरुस्त होऊन घरी परतले आहेत. पोस्ट कार्यालय परिसरातील ७२ वर्षीय वृद्ध इसमासह आजच्या ६७ वर्षीय इसमावर सुरत येथे उपचार सुरु आहेत. २८ वर्षीय महिलेवर व्यारा येथे व विसरवाडीच्या ५२ वर्षीय महिलेवर नंदुरबार येथे उपचार सुरु आहेत. दवाखान्यातील भेटीसाठी आजचे रुग्ण व संशयित परगावी व परराज्यात प्रवास करुन आल्याची प्राथमिक माहिती आहे.
शहरात दोन रुग्णांचा पॉझिटीव्ह अहवाल जाहीर होताच प्रशासनाने तातडीने तो परिसर सील करुन उपाययोजना केली. तहसीलदार सुनिता जºहाड, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांनी तातडीने दोन्ही ठिकाणी भेट दिली. संबंधित दोन्ही रुग्ण राहत असलेला भाग बॅरीकेटींग लावून सील करुन तो परिसर प्रशासनाने कंटेंटमेन्ट झोन घोषित केला असून आरोग्य विभागातर्फे तातडीने दक्षता म्हणून परिसरातील सर्व घरांचे डोअर टू डोअर सर्वेक्षण व थर्मल स्कॅनिंग सुरु केले आहे. या रुग्णाच्या संपर्कातील लोकांना शोधून क्वारंटाईन करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. १४ दिवसाची ही प्रक्रिया लक्षात घेता शितल सोसायटीमधील काही नागरिकांनी तात्पुरत्या स्वरुपात आपले बस्तान इतरत्र बसविले आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने सरकारी यंत्रणेसह तालुक्यातील जनतेच्या चिंता वाढल्या आहेत. या सर्व रुग्णांची ट्रॅव्हल हिस्ट्री समोर येत असल्याने शक्यतोवर प्रवास व गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, सोशल डिस्टंन्सिंग व मास्क वापराचे पालन करावे, सॅनिटायजरचा नियमित वापर करावा व जास्त सतर्क राहून शासनाच्या सर्व नियमांचे पालन करावे, विनाकारण घराबाहेर पडू नये व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार सुनीता जºहाड, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, पोलीस निरिक्षक विजयसिंग राजपूत, पालिका मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शशिकांत वसावे यांनी केले आहे.