मुंबई येथे कर्तव्य बजावून आलेल्या वाहकाचा कोरोनामुळे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 01:09 PM2020-12-02T13:09:10+5:302020-12-02T13:09:19+5:30

 हर्षल साळुंखे लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोनाचे संक्रमण वाढू नये म्हणून मुंबईतील रेल्वे लोकल सेवा बंद करण्यात आली ...

Coroner dies while on duty in Mumbai | मुंबई येथे कर्तव्य बजावून आलेल्या वाहकाचा कोरोनामुळे मृत्यू

मुंबई येथे कर्तव्य बजावून आलेल्या वाहकाचा कोरोनामुळे मृत्यू

Next

 हर्षल साळुंखे
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : कोरोनाचे संक्रमण वाढू नये म्हणून मुंबईतील रेल्वे लोकल सेवा बंद करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी लोकल सेवेला पर्याय म्हणून बेस्ट बसच्या माध्यमातून बसफेऱ्याद्वारे प्रवाशांची वाहतूक करण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे विविध आगारातून कर्मचारी मुंबई येथे सेवा बजावण्यासाठी जात आहेत. शहादा येथून सेवा देण्यासाठी गेलेले यशवंत तुकाराम सोनवणे या वाहकाचा कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाला आहे.
संपूर्ण राज्यात कोरोनाची वाढती संख्या बघता शासनाने लॉकडाऊन लावला. मुंबईसारख्या महानगरात वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या बघता शासनाने संपूर्ण मुंबईत अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच बंद केले. मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणारी रेल्वेची लोकल सेवा बंद असल्याने मोठ्या प्रमाणावर प्रवासी बेस्ट बसच्या सेवेकडे वळल्याने अतिरिक्त भार पडत असल्यामुळे एस.टी. महामंडळातील विविध आगारातील कर्मचाऱ्यांना मुंबई येथे बेस्ट बसमध्ये सेवा देण्यासाठी बोलविण्यात आले. त्यानुसार शहादा आगारातूनदेखील टप्प्याटप्प्याने चालक व वाहक कर्मचाऱ्यांना आठ ते १५ दिवसांसाठी सेवा बजावण्यासाठी पाठवण्यात आले. मात्र यात कर्मचाऱ्यांचे काही न ऐकता आधीच विविध आजारांनी त्रस्त असलेले व ५० वर्षावरील कर्मचाऱ्यांनाही मुंबईला सेवा देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी पाठवल्याने कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे.
शहादा आगारातील वाहक यशवंत तुकाराम सोनवणे (५२) हे २८ वर्षापासून शहादा आगारात सेवा देत होते. अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार १४ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे बेस्ट बसेसमध्ये सेवा देण्यासाठी ते गेले होते. आठ दिवस सेवा दिल्यानंतर शहादा येथे परत आल्यावर त्यांना त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांनी कोविड चाचणी करून घेतली. त्यात त्यांचा रिपोर्ट पॉझीटीव्ह आल्याने त्यांना नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयातील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना खाजगी रुग्णवाहिकेने नाशिक येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान सोमवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. कोविड नियमानुसार नाशिक येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मयत यशवंत सोनवणे यांना आधीच हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यानुसार त्यांची ऍन्जिओग्राफी करण्यात आली आहे. त्यांचे वय  ५२ असल्यामुळे मला मुंबई येथे न पाठवता येथे ड्युटी लावण्याची विनंती त्यांनी करूनही अधिकाऱ्यांनी काही न ऐकता भाऊ यशवंत यांना मुंबई येथे पाठवले. आधीच ते आजाराने त्रस्त असूनही त्यांना मुंबईला पाठवल्यामुळे सेवा देत असताना त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. मुंबई येथे ते जाण्यास तयार नसतानाही जबरदस्तीने त्यांना पाठविण्यात आले, असा आरोप करीत पाठवणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सोनवणे यांचे भाऊ व कुटुंबाने केली आहे. सोनवणे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुषाचा मृत्यू झाल्याने सोनवणे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
 

Web Title: Coroner dies while on duty in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.