घरकुल वाटप प्रक्रिया पुन्हा रखडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 02:48 PM2017-08-29T14:48:24+5:302017-08-29T14:48:24+5:30
876 घरे बांधून तयार : आता पुन्हा नव्याने अर्ज भरून घेणार, लाभार्थी निवडीचा प्रश्न
ऑनलाईन लोकमत
दिनांक 29 ऑगस्ट
नंदुरबार : नंदुरबारातील घरकुलांचा तिढा सुटण्याच्या मार्गावर नसल्याचे चित्र आहे. तयार असलेल्या 876 घरकुलांसाठी आता लाभाथ्र्याना नव्याने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या आधी घरकुल वाटप होणे शक्य नसल्याचे एकुण चित्र आहे.
नंदुरबारातील 3340 झोपडपट्टी धारकांपैकी पात्र लाभाथ्र्यासाठी पालिकेच्या प्रस्तावावरून शासनाने आठ वर्षापूर्वी 1176 घरकुलांना मंजुरी दिली होती. त्यापैकी 876 घरकुले बांधकामास परवाणगी मिळाली होती. ही बाब लक्षात घेता पालिकेने त्यासाठी भोणे फाटय़ाजवळील जागा आणि शासकीय रुग्णालयासमोरील जागा या घरकुलांसाठी मंजुर केली होती. या दोन्ही ठिकाणी अपार्टमेंटच्या धर्तीवर घरकुलांचे बांधकाम देखील करण्यात आले आहे. परंतु लाभार्थी निवड आणि इतर बाबींमुळे त्याचे वाटप रखडले आहे. हा तिढा सुटण्याच्या मार्गावर असतांना आता पुन्हा पालिकेने नव्याने प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी पात्र लाभार्थ्ीकडून नव्याने अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यामुळे किमान सहा महिने तरी घरकुलांचे वाटप रखडणार हे जवळपास स्पष्ट आहे.
पालिकेतर्फे यापूर्वी शहरातील फोटोपास धारक झोपडपट्टीवासीयांना घरकुलांसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यासाठी तीन ते चार वेळा मुदतवाढही देण्यात आली. परंतू फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणा:या कुटूंबाचे घर किंवा झोपडी ज्या भागात असेल ती जागा पालिकेच्या ताब्यात द्यावी लागणार होती, तरच घरकुलाचा ताबा मिळणार होता. जुनी घरे किंवा झोपडी या शहराच्या लगत किंवा शहरात आणि लोकवस्तीत असल्यामुळे शिवाय वर्षानुवर्ष त्या ठिकाणी राहण्याची सवय झाल्याने जुने घर किंवा झोपडी सोडण्यास कुणी सहसा तयार होत नाही. याशिवाय लाभार्थी हिस्सा म्हणून 10 ते 12 हजार रुपये देखील भरावे लागणार होते. त्यामुळे या योजनेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला आणि ही प्रक्रिया रखडली.
दुसरीकडे बेघर संघर्ष समितीतर्फे जी यादी देण्यात आली आहे त्याच यादीतील लाभार्थ्ीची निवड करावी अशी मागणी लावून धरण्यात आली होती. ती यादी मंजुर होत नसल्याचे पाहुन अर्धवट बांधकाम असलेल्या घरकुलांमध्ये संबधितांनी ताबा देखील मिळविला होता. तब्बल आठ ते दहा महिने हा ताबा घेत संबधितांनी घरकुल सोडले नव्हते. अखेर पोलिसांचा हस्तक्षेप आणि जिल्हाधिका:यांच्या मध्यस्थीने ही घरकुले खाली करण्यात आली. त्यानंतर उर्वरित बांधकाम पुर्ण करण्यात आले आहे. आता ही घरकुले वाटपासाठी पुर्णपणे तयार असून त्यासाठी लाभार्थी निवड प्रक्रिया राबविणे तेवढे बाकी आहे.
पुन्हा नव्याने सुरुवात
लाभार्थी निवड प्रक्रियेची आता पुन्हा नव्याने सुरूवात करण्यात येत आहे. लाभार्थी आपले जुन्या घराची जागा पालिकेला देण्यास तयार नसल्यामुळे मागे राबविण्यात आलेली सर्वच प्रक्रिया रद्दबातल ठरवून नव्याने अर्ज करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. त्यासाठी पालिकेच्या बांधकाम विभागात 25 रुपये भरून अर्ज मिळणार आहेत. अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह परिपुर्णपणे भरून देण्याची मुदत 18 सप्टेंबर आहे.