एकाचवेळी चौघांवर अंत्यसंस्कार : गावाच्या हाकेच्या अंतरावरच काळाचा घाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 01:17 PM2017-12-29T13:17:35+5:302017-12-29T13:17:39+5:30

Cremation on four occasions at the same time: The wounds of the time at the distance of the village | एकाचवेळी चौघांवर अंत्यसंस्कार : गावाच्या हाकेच्या अंतरावरच काळाचा घाव

एकाचवेळी चौघांवर अंत्यसंस्कार : गावाच्या हाकेच्या अंतरावरच काळाचा घाव

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
म्हसावद : रात्रभर धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन परत येत असतांना हाकेच्या अंतरावर असलेल्या आपल्या तलावडी गावात पोहचण्याच्या आधीच पाच जणांवर काळाने अचानक घाला घातला. सकाळी-सकाळी घडलेली ही घटना तलावडी गावावर शोककळा पसरवून गेली. एकाच गावातील चौघांचा अकाली मृत्यू आणि 13 जणांना बसलेला गंभीर मार अंगावर शहारे आणणारा ठरला. दरम्यान, गावातील चारही मृतांवर सायंकाळी अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.  
शहादा-म्हसावद रस्त्यावर आमोदा फाटय़ानजीक गुरुवारी सकाळी घडलेल्या अपघाताच्या घटनेत तलावडीतील चार जणांना आपला जीव गमवावा लागला. भल्या सकाळी घडलेल्या या घटनेमुळे म्हसावद पंचक्रोशी सुन्न झाली. दिवसभर याच घटनेची चर्चा परिसरात होती.
तलावडी येथील 17 जण अॅपे रिक्षाने भोंगरा, ता.शहादा येथे इंदल कार्यक्रमानिमित्त बुधवारी रात्री गेले होते. त्यासाठी त्यांनी लक्कडकोट येथील रिक्षाचालक संजय रायमल रावताळे यांची रिक्षा भाडय़ाने केली होती. बुधवारी रात्री भोंगरा येथे पोहचल्यानंतर त्यांनी रात्रभर इंदल उत्सवात सहभाग घेतला. हा उत्सव अर्थात रात्रभर चालतो. पहाटे त्याचा समारोप केला जातो. पहाटे समारोप झाल्यानंतर तलावडीची सर्व मंडळी पुन्हा त्याच रिक्षाने आपल्या    गावाकडे सकाळी साडेपाच वाजता निघाली. 
सकाळी सात वाजेच्या सुमारास त्यांची रिक्षा आमोदा फाटय़ाजवळ आली असता समोरून येणा:या मालवाहू टेम्पोची समोरासमोर धडक झाली. धडक इतकी जबरदस्त होती की रिक्षाचा अक्षरश: चक्काचूर झाला. त्यात अडकून चार जण जागीच ठार झाले होते. 
गाव हाकेच्या अंतरावर
भोंगरा ते तलावडी हे अंतर साधारणत: 45 किलोमिटर आहे. त्यातील 42 ते 43 किलोमिटर अंतर त्यांनी सुखरूप पार पाडले. आमोदा गावापासून अर्थात अपघात स्थळापासून तलावडी अवघ्या दीड ते दोन किलोमिटर अंतरावर असतांना काळाचे अचानक घाला घातला.   घरी जाण्याची ओढ त्यांच्या     जिवावर बेतली आणि होत्याचे नव्हते झाले.
गावावर शोककळा
गावात प्रथमच काळाचा अशा प्रकारे घाला झाला होता. प्रथमच एकाच वेळी चार जणांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यामुळे गावात शोककळा पसरली होती. जे जखमी झाले होते त्यांच्या चौकशीसाठी नातेवाईकांची धावपळ उडाली होती. गरीब कुटूंबातील सर्व असल्यामुळे त्यांना म्हसावद व शहादा येथे जाण्यासाठी देखील वाहन उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे जखमींच्या प्रकृतीची त्यांच्या कुटूंबियांना काळजी लागली होती.
यांनी केले उपचार
भल्या सकाळी अपघाताची माहिती होताच आमोदा, म्हसावद येथील ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. म्हसावदचे सहायक पोलीस निरिक्षक राकेश चौधरी यांच्यासह पोलीस पथक दाखल झाले. जेसीबीच्या सहायाने मालवाहू ट्रक उचलून गाडीखाली दाबलेल्यांना बाहेर काढण्यात आले. तोरणमाळ, मंदाणा, म्हसावद, शहादा येथील रुग्णवाहिकांद्वारे मयत व जखमींना तातडीने म्हसावद ग्रामिण रुग्णालय व तेथून जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. 
म्हसावद रुग्णालयात वैद्यकीय अधिक्षक अे.आर.शेख, डॉ.प्रल्हाद पवार, डॉ.भूषण पाटील, डॉ.सोनल भावसार, डॉ.श्याम ठाकुर, डॉ.अविनाश पाटील, डॉ.राजेश पाटील, डॉ.सचिन परदेशी, डॉ.रिमान पावरा यांच्यासह गावातील डॉ.रजनीकांत सूर्यवंशी, डॉ.अरुण लांडगे, डॉ.बलराज पावरा यांनी प्राथमिक उपचार केले. शहादा रुग्णालयात डॉ.गोविंद शेल्टे व त्यांच्या सहका:यांनी शवविच्छेदन केले.
आरटीओंची पहाणी
अपघातस्थळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये, निरिक्षक पी.एम.सैंदाणे, ओमप्रकाश यांनी दुपारी भेट देवून पहाणी केली. या मार्गावरील अवैध प्रवासी वाहतुकीवर लवकरच कारवाई करण्याचे सुतोवाच त्यांनी केले.
उपविभागीय पोलीस अधिकारी महारू पाटील यांच्यासह इतरही वरिष्ठ अधिका:यांनी भेट दिली. म्हसावद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

Web Title: Cremation on four occasions at the same time: The wounds of the time at the distance of the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.