Crime: म्हैशीवर आदळली दुचाकी, संतप्त जमावाने १६ वर्षांच्या मुलाला बेदम मारून जीव घेतला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 04:49 PM2023-10-24T16:49:44+5:302023-10-24T16:50:02+5:30

Crime News: झारखंडमधील दुमका येथे दुचाकीने म्हैशीला धडक दिल्याने एका १६ वर्षीय मुलाला बेदम मारहाण करून जिवे मारण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Crime: Bike hits buffalo, 16-year-old boy killed by angry mob | Crime: म्हैशीवर आदळली दुचाकी, संतप्त जमावाने १६ वर्षांच्या मुलाला बेदम मारून जीव घेतला

Crime: म्हैशीवर आदळली दुचाकी, संतप्त जमावाने १६ वर्षांच्या मुलाला बेदम मारून जीव घेतला

झारखंडमधील दुमका येथे दुचाकीने म्हैशीला धडक दिल्याने एका १६ वर्षीय मुलाला बेदम मारहाण करून जिवे मारण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, पोलिसांनी दोन दिवसांच्या आत आरोपींच्या मुसक्या आवळण्यात येतील, असं आश्वासन ग्रामस्थांना दिलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना हंसडिहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ठाठी गावातील आहे. पोलिसांनी सांगितले की, टोला येथील कुरमाहाट येथील राहणारा एक १६ वर्षांचा मुलगा दुचाकीवरून तीन मित्रांसह फुटबॉलचा सामना पाहून येत होता. त्यावेळी रस्त्यामध्ये त्याची दुचाकी एका म्हैशीवर आदळली. त्यानंतर तिथे असलेले लोक संतप्त झाले. त्यांनी या मुलाला मारहाण करण्यास सुरवात केली.

उपमंडल पोलीस अधिकारी आमोद नारायण सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकी म्हैशीवर आदळल्यानंतर दुचाकीवरील मुले आणि म्हैशींच्या झुंडीसोबत असलेले लोक यांच्यात वादावादी सुरू झाली. पीडित मुलाने म्हैशीच्या मालकाला नुकसान भरपाई देण्याची तयारी दर्शवली. मात्र चार जणांनी त्याच्यावर हल्ला केला. पोलिसांनी सांगितले की, मारहाण झालेल्या तरुणाला सरैयाहाट येथील आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तिथे पोलिसांनी त्याला मृत घोषित केले.

आरोपींनी हल्ला केल्यानंतर पीडिताला तिथेच सोडून सोबत आलेली मुलं पळून गेली. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, आरोपींना अटक करण्यात यावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी रास्तारोको केले. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना दोन दिवसांत अटक करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर ग्रामस्थ शांत झाले.  

Web Title: Crime: Bike hits buffalo, 16-year-old boy killed by angry mob

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.