बोगस पटपडताळणीप्रकरणी नटेश्वर व मानमोडे शाळेवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 12:50 PM2018-08-10T12:50:36+5:302018-08-10T12:50:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : बोगस पटपडताळणी प्रकरणी नटेश्वर विद्यालय नटावद, ता.नंदुरबार व माध्यमिक विद्यालय, मानमोडे, ता.शहादा या शाळांवर अपहराचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. जिल्ह्यात एकुण आठ शाळा असून आता सहा शाळांवर कधी गुन्हे दाखल होतात याकडे लक्ष लागून आहे.
शासनाने 2011 मध्ये पटपडताळणी केली होती. या वेळी ज्या शाळांनी बोगस पटपडताळणी दाखविली त्या शाळांवर कारवाईच्या सुचना देण्यात आल्या होत्या. नुकतेच न्यायालयानेही याबाबत आदेश दिल्याने आता गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्ह्यात एकुण आठ शाळा आहे. पैकी दोन शाळांवर गुन्हे दाखल झाले.
नटावद, ता.नंदुरबार येथील नटेश्वर विद्यालयात ऑगस्ट व ऑक्टोबर 2011 मध्ये वेगवेगळी पटसंख्या दाखविण्यात आली होती. त्या आधारावर एका शिक्षकास नियुक्ती देवून त्यास तीन लाख रुपये वेतनापोटी शासनाकडून रक्कम देण्यात आली. याप्रकरणी गट शिक्षणाधिकारी चिंधू कौतिक पाटील यांनी फिर्याद दिल्याने तत्कालीन संस्थाध्यक्ष कै.बी.के.रघुवंशी, सचिव यशवंत पाटील व मुख्याध्यापक फत्तूसिंग गावीत यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
याशिवाय ज्ञान प्रबोधिनी विद्यामंदीर दोंडाईचा संचलित माध्यमिक विद्यालय मानमोडे, ता.शहादा येथे देखील ऑगस्ट ते ऑक्टोबर 2011 या काळात शाळेने बोगस पटसंख्या दाखवून 486.750 किलो तांदूळ आणि तीन हजार 894 रुपये मानधन शाळेने हडप करण्यात आले. याबाबत गटशिक्षणाधिकारी आनंदराव दगा पाटील यांनी फिर्याद दिल्याने संस्थाध्यक्ष वसंत छगन चौधरी, भुपेंद्र छगन चौधरी रा.दोंडाईचा व मुख्याध्यापक सुधाकर सैंदाणे, शहादा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.