नायलॅान मांजा विकणाऱ्यावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 01:29 PM2021-01-05T13:29:56+5:302021-01-05T13:30:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पतंगोत्सवात नायलॅानचा मांजा विक्रीस बंदी असतांनाही नंदुरबार, शहाद्यात त्याची मोठ्या प्रमाणावर विक्री होत होती. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पतंगोत्सवात नायलॅानचा मांजा विक्रीस बंदी असतांनाही नंदुरबार, शहाद्यात त्याची मोठ्या प्रमाणावर विक्री होत होती. याबाबत ‘लोकमत’ने सोमवार, ४ जानेवारीच्या अंकात वृत्त प्रसिद्ध करताच पोलिसांनी एका विक्रेत्यावर कारवाई केली. शिवाय पोलीस अधीक्षक कार्यालयाने याबाबत थेट कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
मकरसंक्रातीनिमित्त जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पतंगोत्सव साजरा केला जातो. त्यासाठी यंदा मोठ्या प्रमाणावर नायलॅानचा मांजा विक्रीस आला आहे. वास्तविक या मांजावर बंदी असतांनाही त्याची विक्री होत होती. गेल्या वर्षी या मांजामुळे मोठ्या प्रमाणावर पक्षी मृत्यूमुखी पडले होते. शिवाय अनेक दुचाकीचालक देखील जायबंदी झाले होते. यंदा हा मांजा विक्री होत असल्याबाबत ‘लोकमत’ने सोमवारी सविस्तर वृत्त प्रसिद्ध करताच पोलिसांनी लागलीच कारवाई केली. शहरातील दादा गणपती मंदीराजवळ पतंग विक्री करणारे रवींद्र तुमडू पाटील यांनी नायलॅान मांजा विक्री केला. त्यांच्याकडून पोलिसांनी २४०० रुपयांचा मांजा जप्त केला. याबाबत पोलीस कर्मचारी विशाल बोरसे यांनी फिर्याद दिल्याने रवींद्र पाटील यांच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार श्रीकांत माळी करीत आहे.
दरम्यान, याबाबत पोलीस अधीक्षक कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीय हरीत न्यायधिकरण यांनी पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणारा नायलॅान किंवा तत्सम रसायन वापर तयार केलेला मांजा याचा वापर करणे,विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. ही बाब कायद्याने गुन्हा आहे. मुंबई खंडपीठाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल जनहित याचिकेच्या अन्वये ही बाब अधोरेखीत देखील केली आहे. त्यामुळे असा प्रकार आढळल्यास थेट कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.