मोकाट गुरांमुळे पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 01:20 PM2020-12-31T13:20:41+5:302020-12-31T13:20:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क म्हसावद :  शहादा तालुक्यातील म्हसावद गावात व गावालगत मोठ्या प्रमाणात मोकाट गुरे व वराहांचा त्रास ग्रामस्थांसह ...

Crop damage due to Mokat cattle | मोकाट गुरांमुळे पिकांचे नुकसान

मोकाट गुरांमुळे पिकांचे नुकसान

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
म्हसावद :  शहादा तालुक्यातील म्हसावद गावात व गावालगत मोठ्या प्रमाणात मोकाट गुरे व वराहांचा त्रास ग्रामस्थांसह शेतकऱ्यांना होत असून, शेतात नुकसानही होत आहे. म्हसावद गावालगत असलेल्या पिंपरी येथील शेतकऱ्याच्या चार एकर उसापैकी चक्क दीड एकर ऊस या मोकाट गुरांनी फस्त करून नुकसान केले आहे. ग्रामपंचायत प्रशासन व पोलीस प्रशासनाने यावर उपाययोजना करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
म्हसावद गावालगत असलेल्या केळी व उसाच्या शेतात वराहांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. केळीच्या शेताला चोहोबाजूने तारेची जाळी बसवून कुंपण केले आहे. तरीही जाळी वाकवून खालून वराह घुसतात. काही वराहांचा मुक्काम तर उसाच्या शेतातच असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी करावे तरी काय?हा प्रश्न पडला आहे. पिंपरी येथील शेतकरी रघुनाथ अर्जुन पाटील यांचे म्हसावद गावालगत चार एकर क्षेत्रात उसाची लागवड केलेली असून शेताला काटेरी तारेचे कुंपणही केलेले असूनही मोकाट गुरांनी चक्क दीड एकर ऊस फस्त केला आहे. शिल्लक उसाची ऊंची एक फुटावर तर खाऊन नुकसान केलेला ऊस जमीनदोस्त झालेला आहे. टवळाई रस्त्यालगत असलेल्या म्हसावद येथील नगीन छगन चौधरी यांचा एक एकर क्षेत्रातील ऊस फस्त केला आहे. दुसरीकडे गावालगत रिकाम्या गुरांच्या झुंडीच्या झुंडी गहू, हरभरा पेरणी केलेल्या शेतांमध्ये घुसून नुकसान करीत आहेत. पिकांचे खाऊन नुकसानीपेक्षा पिके पायदळी जास्त तुडवले जात असल्याने जास्त नुकसान होत आहे. रिकाम्या गुरांना पकडणे म्हणजे तारेवरची कसरत असून, पकडण्याचा प्रयत्न केल्यास अंगावर धावून येतात. यात काही दुभती जनावरेही आहेत. पशुपालक सकाळ-संध्याकाळ दूध काढून घेतात, चारा मात्र टाकत नाही. बेवारस गुरांप्रमाणे सोडून मोकळे होतात. रिकामी गुरे रात्रभर शेतात, तर दिवसा गावात त्रास देत आहेत. रिकामी गुरे पकडून गोशाळेत पाठवावीत, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकरी व ग्रामस्थांनी बोलून दाखवली. अनेकवेळा ग्रामपंचायत व पोलीस प्रशासन यांच्याकडे कळवूनही काही कार्यवाही केली जात नसल्याने ग्रामस्थांत नाराजी आहे. रिकामी गुरे पकडून कोंडण्यासाठी ग्रामपंचायतीचा कोंडवाडा आहे. मात्र त्यात चार-पाच वर्षांपासून एकही गुरेढोरे कोंडली गेलेली नाहीत. कोणीही गुरे पकडून आणत नाही. गुरे कोणी पकडली? का पकडली? नुकसान दाखव? यावरून वाद होतात यासाठी ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाने पुढाकार घेऊन ग्रामस्थांची समस्या सोडवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: Crop damage due to Mokat cattle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.