ऋषीपंचमीनिमित्त तापी नदी पात्रात स्नानासाठी महिलांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:34 AM2021-09-12T04:34:46+5:302021-09-12T04:34:46+5:30
ऋषीपंचमीनिमित्त तापी नदीत स्नान केल्यावर पुण्य लागते, अशी महिलांची श्रद्धा आहे. शनिवारी पहाटेपासूनच महिलांची गर्दी जमली होती. मंदिर महाराष्ट्रासह ...
ऋषीपंचमीनिमित्त तापी नदीत स्नान केल्यावर पुण्य लागते, अशी महिलांची श्रद्धा आहे. शनिवारी पहाटेपासूनच महिलांची गर्दी जमली होती. मंदिर महाराष्ट्रासह गुजरात व मध्य प्रदेशातून शेकडो महिलांनी तापी नदीत स्नान करुन पूजाअर्चा केली.मंदिरे बंद असल्याने महिलांनी बाहेरूनच दर्शन घेतले. गेल्यावर्षी ऋषीपंचमीला प्रकाशा तीर्थक्षेत्र पूर्णपणे बंद होते. यंदा मात्र तापी नदीत स्नानाला कोणतीही बंदीची पूर्वसूचना नव्हती. त्यामुळे लांब अंतरावरुन महिला स्नान करण्यासाठी आल्या होत्या. तापी नदीत स्नान झाल्यावर महिलांनी ब्रह्मवृंदाकडून अरुंधती व सप्तऋषी यांची कथा भर पावसात श्रवण केली. केदारेश्वर, काशीविश्वेश्वर, पुष्पदंतेश्वर, सद्गुरु धर्मशाळा आदी सर्वच मंदिरे बंद होती. महिलांनी बाहेरूनच दर्शन घेतले. मंदिर ट्रस्टचे संचालक सुरेश पाटील, अमोल पाटील, गजानन भोई, मुकेश साळे, पोलीस कर्मचारी सुनील पाडवी आदी मंदिराबाहेर थांबून होते.
ऋषीपंचमीचे व्रत केल्यास पापापासून मुक्ती मिळते, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे महिलांनी ब्रह्मवृंदाकडून अरुंधती, काश्यप, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम ऋषी, जमदग्नी वशिष्ठ, अत्री या ऋषींची पूजा करून कथा श्रवण केली. कथा श्रवण झाल्यावर घाटावरील महादेवाला अभिषेक करून ब्रह्मवृंदांना विविध धान्य दान दिले.
प्रकाशा येथील सर्वच मंदिर परिसरात पूजेचे साहित्य, नारळ, बेल, चंदन, हळद-कुंकू, फुलहार, उपहारगृहे, रसवंती, चहा, खेळणीची दुकाने, विविध फोटो विक्री व मूर्ती विक्री, फळांची दुकाने थाटली होती. त्यामुळे मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते.
पट्टीचे पोहणारे तैनात
महिलांची ऋषीपंचमीला होणारी गर्दी लक्षात घेता महसूल विभागाने प्रकाशा येथील मच्छीमारांची नियुक्ती तापी घाटावर केली होती. मंडळ अधिकारी मुकेश चव्हाण, तलाठी धर्मराज चौधरी यांनी प्रकाशा येथील सीताराम भगत झिंगा भोई यांच्यासह १२ जणांना लाईफ जाकीट घालून तापी नदीच्या काठावर महिलांच्या सुरक्षितेसाठी तैनात केले होते.
११ वाजेनंतर पोलिसांनी केला तापी घाट खाली
सकाळी साडेदहा वाजेनंतर महिलांची वाढती गर्दी लक्षात घेता शहाद्याचे पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी आपल्या सहकार्यांसह तापी नदी घाटावरुन महिलांना बाहेर जाण्यास सांगितले. तसेच मंदिर परिसरातील दुकानेही बंद करण्याच्या सूचना बुधवंत यांनी दुकानदारांना दिल्या. त्यानंतर मात्र गर्दी मात्र ओसरली व दिवसभर गर्दी झालीच नाही.
महिला भक्त नाराज:-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही चार-पाच दिवस आधी ऋषीपंचमीला प्रकाशा येथील तापी घाटावर गर्दी करु नये, अशी सूचना दिली असती तर आम्ही महिला भाविका लांब अंतरावरुन आलो नसतो. आता एवढ्या लांबून आलो आणि दर्शन झाले नाही, अशा प्रतिक्रिया अनेक महिला भाविकांनी व्यक्त केल्या.
व्यावसायिकांचे झाले नुकसान
ऋषीपंचमीला गर्दी होते म्हणून व्यावसायिकांनी नारळ, पूजेचे साहित्य, फळे आधीच विक्रीसाठी भरून ठेवली होती. सकाळपासून ११ वाजेपर्यंत विक्री सुरळीत सुरू होती. मात्र ११ वाजेनंतर सर्व दुकाने बंद झाल्याने व्यावसायिकांचे नुकसान झाले. पोलिसांनी त्यांचे काम केले त्याबाबत दुमत नाही परंतु ही सूचना जर चार-पाच दिवस आधीच दिली असती तर आम्ही विक्रीसाठी माल भरून ठेवला नसता, अशी खंत व्यावसायिकांनी व्यक्त केली.