प्रकाशा-तोरणमाळ रस्त्यावर दिशादर्शक फलक नसल्याने हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 12:19 PM2020-12-06T12:19:43+5:302020-12-06T12:19:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : प्रकाशा ते तोरणमाळ या नवीन रस्त्याचे काम संबंधित विभागातर्फे सुरू करण्यात आले आहे. मात्र ...
लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : प्रकाशा ते तोरणमाळ या नवीन रस्त्याचे काम संबंधित विभागातर्फे सुरू करण्यात आले आहे. मात्र प्रकाशा ते म्हसावदपर्यंतच्या मार्गवर ठेकेदाराने ज्याठिकाणी रस्ता व गटारींचे काम सुरू केले आहे त्याठिकाणी दिशादर्शक फलक, रेडियमच्या खूना लावण्यात आल्या नसल्याचे दिसून येत असून, याठिकाणी रात्रीच्या वेळेस अपघात घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे संबंधितांनी याकडे गांभीर्याने लक्ष देवून मार्गदर्शक फलक लावण्याची मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, प्रकाशा येथील केदारेश्वर मंदिर ते बस स्थानकापर्यंतच्या रस्त्यावर गटारीच्या कामासाठी चारी खोदण्यात आली असून, रात्रीच्या वेळेस दोन वाहने मार्गस्थ होताना चारीचा अंदाज येत नसल्याने अनेक वाहने खाली उतरून अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यामुळे ज्या-ज्या ठिकाणी खोदकाम अथवा रस्त्याच काम सुरु आहे. त्याठिकाणी मार्गदर्शक फलक लावण्याची मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.
तसेच ज्या ठिकाणी डांबरीकरणाचे काम झाले तेथे रस्त्याच्या मधोमध दगड ठेवले असून, वाहनधारकांना कच्च्या रस्त्यावरून वाहन काढावे लागत आहे. मात्र या कच्च्या रस्त्यावर वाहन घसरण्याचे प्रकार वाढले असून, संबंधित ठेकेदाराने रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करुन वाहनधारकांना हा मार्ग खुला करून द्यावा, अशी मागणी होत आहे. तसेच पर्यायी रस्त्यावर मुरूमचा भराव करून सुस्थितीत करावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.