शालेय साहित्य विक्रेत्यांना ग्राहकांची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 12:36 PM2020-07-22T12:36:33+5:302020-07-22T12:36:39+5:30
हर्षल साळुंखे । लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे शैक्षणिक साहित्य विक्री करणाऱ्या व्यवसायावर ...
हर्षल साळुंखे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे शैक्षणिक साहित्य विक्री करणाऱ्या व्यवसायावर मंदीचे सावट आले आहे. शाळा उघडण्याबाबत कुठलाही शासन निर्णय होत नसल्याने आर्थिक फटका बसला आहे. शहरातील विविध शैक्षणिक साहित्य विक्रीच्या दुकानांवर ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणात यावर्षी १० टक्केही साहित्य विक्री झाले नसल्यामुळे हतबल झाल्याचे व्यवसायिकांनी सांगितले.
कोरोना संसर्गजन्य आजारामुळे मार्च महिन्यात सुरू झालेला लॉकडाऊन जून महिन्यापर्यंत कायम होता आणि आता रुग्ण संख्या वाढत असल्याने स्थानिक प्रशासनाकडून लॉकडाऊन घोषित करण्यात येतो. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यावसायिक अडचणीत आले आहेत. शैक्षणिक साहित्य व्यवसायिक अद्यापही मंदीच्या चक्रव्यूहात अडकले आहेत. १५ जूनला शाळा उघडतात. त्यासाठी शैक्षणिक साहित्य विक्रेते अगोदरच आपल्या दुकानात सर्व साहित्य खरेदी करून ठेवतात. परंतु यंदा कोरोना संसर्गजन्य आजाराने शाळा उघडल्या नसल्याने शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक साहित्य खरेदी पूर्णपणे ठप्प झाली आहे. शहरातील काही विद्यालयांनी आॅनलाईन अध्यापन सुरू केले आहे. मात्र शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी विद्यार्थी पुढे आलेले दिसत नाही. आॅनलाईन अभ्यासक्रम शिक्षकाकडून सुरू झाला आहे. मात्र विद्यार्थी वह्या, पुस्तके व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी दुकानांवर येत नसल्याचे व्यवसायिकांनी सांगितले.
ग्रामीण भागातील शाळाही बंद असल्याने शाळेचे दप्तर, वॉटरबॅग, वह्या, पुस्तके, कंपासपेटी आदी खरेदीसाठी विद्यार्थी, पालक दुकानांकडे फिरकत नाहीत. यामुळे शैक्षणिक साहित्य विक्री करणाºया दुकानदारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. तर इतर लहान व्यापाऱ्यांना शैक्षणिक साहित्य खरेदी करावी किंवा नाही, ग्राहक येईल का, शाळा केव्हा उघडतील असे विविध प्रश्न भेडसावत आहेत. काही दुकानदारांनी गेल्या वर्षापेक्षा फक्त २५ टक्के माल खरेदी केला आहे. व्यावसायिकांकडून शैक्षणिक साहित्याची खरेदी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये करण्यात येते. हे शैक्षणिक साहित्य दुकानांपर्यंत एप्रिल-मे महिन्यात येऊन पोहोचते. यावर्षी अद्यापही शाळा सुरू नसल्याने व शाळा कधी सुरू होतील याबाबत शाश्वती नसल्याने खरेदी केलेला माल हा दुकानात पडून आहे. तसेच पैसेही अडकले आहेत. अजून असेच काही दिवस सुरू राहिल्यास कोरोना आजारामुळे मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
जून महिन्यात शैक्षणिक साहित्य विक्रीच्या उलाढालीतून लाखो रुपयांची उलाढाल होते. यावरच संपूर्ण वर्षभराचे नियोजन असते परंतु ही सर्व उलाढाल ठप्प आहे. दुकानदार माल खरेदी करत असताना घाऊक व्यापारी अगोदर पैसे मागत आहेत. उधारीवर माल देण्यास व्यापारी तयार नाहीत. दुकानात ग्राहक नसल्याने हातात पैसा नाही त्यामुळे व्यवसायिक संकटात सापडले असून शाळा सुरु होण्याची वाट पाहत आहेत.