धुरखेडा रस्त्याची चाळण झाल्याने वाहनधारक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 12:32 PM2019-07-10T12:32:33+5:302019-07-10T12:32:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : प्रकाशा ते धुरखेडा हा मार्ग शहादा जाण्यासाठी सोयीस्कर आहे. शहादा ते प्रकाशा रस्त्याच्या रुंदीकरणाचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : प्रकाशा ते धुरखेडा हा मार्ग शहादा जाण्यासाठी सोयीस्कर आहे. शहादा ते प्रकाशा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने गेल्या दीड वर्षापासून लहान-मोठी वाहने याच रस्त्यावरून ये-जा करतात. मात्र या रस्त्यावर सद्यस्थितीत मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्याची अक्षरश: चाळण झाल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
प्रकाशा ते धुरखेडा हा मार्ग शहादा जाण्यासाठी सर्वाना सोयीचा आहे. मात्र या रस्त्यावर वाढलेली काटेरी झुडपे व खड्डय़ांमुळे रस्त्याची झालेली चाळण ही वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. प्रकाशा-शहादा रस्त्यावर कामे जरी सुरू असली तरी पर्यायी रस्ता केला पाहिजे होता. मात्र तसे झाले नाही. या ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे दुचाकींसह लहान-मोठी वाहने या सर्वाना फेरा मारुन जावे लागते. प्रकाशा ते शहादा 12 किलोमीटरचे अंतर आहे. मात्र रस्ता खराबमुळे तब्बल 20 ते 22 किलोमीटर फिरून जावे लागते. मात्र तो रस्ताही सुस्थितीत नाही. प्रकाशा येथून धुरखेडाकडे जाताना सुरुवातीला काटेरी झुडपांचा सामना करावा लागतो. तसेच रस्त्याच्या मध्यभागी मोठमोठे खड्डे पडल्याने सुमारे तीन ते चार किलोमीटर रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे वाहन चालकांना कसरत करीत वाहने काढावी लागतात. हे खड्डे टाळण्याच्या प्रयत्नात अपघातही होत असून संबंधित विभागाने रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.