पाटचारीचे पाणी शेतात शिरल्याने कापूस पिकाचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 01:02 PM2020-07-26T13:02:30+5:302020-07-26T13:02:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने शहादा तालुक्यात दमदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. मात्र शहराबाहेरुन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने शहादा तालुक्यात दमदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. मात्र शहराबाहेरुन गेलेल्या लघुपाटबंधारे विभागाच्या पाटचारीवर अतिक्रमण केल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही. हे पाणी पुढे न जाता साचून राहत असल्याने शिरुड शिवारातील शेतांमध्ये शिरल्याने पिकांचे नुकसान झाले आहे.
खरीप हंगामातील पेरण्या झाल्यानंतर सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने पिके तरारली होती. मात्र १५ दिवसांपासून पावसाने अचानक दडी मारल्याने पिकांना ताण पडू लागला होता. श्रावण महिना सुरू झाल्यानंतरही पावसाची चिन्हे दिसत नसल्याने शेतकरी चिंतेत होते. मात्र शुक्रवारी सायंकाळी दमदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असून शेतांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
कवळीथ बंधाºयावरुन शिरुड, टेंभाकडे शहादा शहरातून लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारीतील पाटचारी गेली आहे. या पाटचारीवर बेकायदेशीर अतिक्रमण झाल्याने पाण्याचा निचरा होत नाही. या पाटचारीतील पाण्याचा काही वर्षापूर्वी शेतकऱ्यांना फायदा होत होता. परंतु अनेक लोकांनी या पाटचारीवर बेकायदेशीर अतिक्रमण केल्यामुळे ठिकठिकाणी पाटचारी फुटल्याने पाणी रस्त्यावर येऊ लागले आहे. दोन वर्षापूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांनी याठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली होती. पाटचारीचे खोलीकरण करण्याचे आदेश देण्यात आले होते. पाटचारीवर झालेले बेकायदेशीर अतिक्रमण काढण्याचे आदेशही दिले होते. त्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी पाटचारीवर अतिक्रमण केलेल्यांना नोटिसाही दिल्या होत्या. मात्र त्यांनी या नोटिसांना केराची टोपली दाखवली.
शुक्रवारी झालेल्या जोरदार पावसाचे पाणी पाटचारीतून न वाहता ते शेतांमध्ये शिरले. शिरुड रस्त्यावर असलेल्या गिरीश पुरूषोत्तम पाटील यांच्या १६ एकरपैकी सहा एकर क्षेत्रात कापसाच्या शेतात हे पाणी शिरल्याने नुकसान झाले. रात्रभर या शेताला तलावाचे स्वरुप प्राप्त झाले होते. शनिवारी सकाळी शेतकरी गिरीश पाटील यांनी शेतातील पाणी काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दरवर्षी पावसाळ्यात शेतकºयांनी ही समस्या सतावत असल्याने व पिकांचे नुकसान होत असल्याने त्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. या पाटचारीवर झालेले सर्व अतिक्रमण काढून पाण्याचा निचरा होण्यासाठी जागा मोकळी करावी, अशी मागणी शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.