तापी नदीवरील प्रकाशा पूल वाहतुकीसाठी धोकेदायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 12:10 PM2017-10-31T12:10:34+5:302017-10-31T12:10:45+5:30
ठिकठिकाणी खड्डे व लोखंडी सळ्या वर आल्याने पुलाला तडे
लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : तापी नदीवर येथे असलेल्या पुलावरील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक अक्षरश: हैराण झाले आहेत. काही ठिकाणी लोखंडी सळ्या वर आल्याने वाहनांचे नुकसान होत असून दुचाकी वाहनधारकांसाठी ते धोकेदायक ठरत आहे. लोखंडी सळ्या वर आल्याने व मोठमोठे खड्डे पडल्याने अवजड वाहनांमुळे पुलाला हादरा बसत असून काही ठिकाणी तडेही जात आहेत.
सविस्तर वृत्त असे की, प्रकाशा गावाजवळ तापी नदीवरील पूल जिल्ह्यातील दळणवळणासाठी मुख्य मानला जातो. या पुलावरुन दिवसभर वाहनांची वर्दळ असते. मात्र पुलावरील रस्त्याच्या दुरवस्थेकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. या पुलावरील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून जागोजागी लोखंडी सळ्या बाहेर आल्या आहेत. या सळ्यांमुळे वाहनांना हादरा बसतो व अपघातही होत आहेत. दीड वर्षापूर्वी या पुलाच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. हे काम महिनाभर सुरू होते. या कामात प्रामुख्याने पुलाच्या खाली बेअरींग टाकणे व पुलाच्या जॉईंटचे काम करण्यात आले होते. पुलावर पडलेल्या खड्डय़ांमध्ये अवजड वाहनाचे चाक पडल्यावर पुलाला हादरा बसतो व जॉईंटच्या ठिकाणी तडे पडत आहेत. दोन ते तीन ठिकाणी असे तडे गेल्याने पुलाला मोठा धोका निर्माण होत आहे. या खड्डय़ांमधून लोखंडी सळ्या बाहेर निघण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून त्यामुळे अपघात होत आहेत.
प्रकाशा येथे रविवारी विसरवाडी-खेतिया या राष्ट्रीय महामार्गाच्या दुस:या टप्प्याचे म्हणजे कोळदा ते खेतियार्पयतच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन झाले. या कार्यक्रमात वि.का. सोसायटीचे चेअरमन हरी पाटील यांनी रस्ते विकास महामंडळाच्या अधिका:यांना पुलावरील खड्डय़ांबाबत विचारणा केली असता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका:यांनी सांगितले की, दीड वर्षापूर्वी पुलाचे काम झाल्याचे सांगितले. मात्र हे उत्तर दिशाभूल करणारे आहे. कारण दीड वर्षापूर्वी पुलाच्या दुरुस्तीचे फक्त बेअरींग टाकणे व जॉईंट दुरुस्तीचे काम झाले होते. दुरुस्तीचे पूर्ण काम झाल्यावर डांबरीकरणाचा एक लेअर टाकणे गरजेचे होते. मात्र ज्या कंपनीने या कामाचा ठेका घेतला होता त्यांनी हे काम केले नाही. परिणामी पुलावर खड्डे पडून तडेही जात आहेत. हा पूल ज्या विभागाच्या अखत्यारीत असेल त्या अधिका:यांनी पुलावरील रस्त्याचे नूतनीकरण करणे गरजेचे आहे अन्यथा पुलाला हानी पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही.