रस्त्याला लागून भगदाड पडल्याने धोकादायक स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:20 AM2021-07-19T04:20:24+5:302021-07-19T04:20:24+5:30
सारंगखेडा-कहाटूळ रस्त्यावरील पांढरी तलावाजवळ पावसाच्या पाण्याने रस्त्याला भगदाड पडल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याठिकाणी संबंधित विभागाने ...
सारंगखेडा-कहाटूळ रस्त्यावरील पांढरी तलावाजवळ पावसाच्या पाण्याने रस्त्याला भगदाड पडल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याठिकाणी संबंधित विभागाने त्वरित संरक्षक भिंत बांधण्याची मागणी सारंगखेडा, कळंबू, पुसनद परिसरातील वाहनधारक, नागरिक व शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. अनरद ते कळंबू व सारंगखेडा ते न्यू असलोद हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तयार करण्यात आला आहे. भगदाड पडलेल्या ठिकाणी चौफुली असून, याठिकाणी कळंबूवरून पुसनदकडे जाणारी त्याचबरोबर सारंगखेडाकडून कहाटूळकडे येणारी व जाणारी वाहने यांची मोठी वर्दळ असते. नेमक्या याच चौफुलीवर रस्त्याला लागून मोठे भगदाड पडल्याने मोठा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून याठिकाणी संबंधित विभागाने तत्काळ संरक्षक भिंत बांधून पुढे होणारा अनर्थ टाळावा. या रस्त्यावर परिसरातील शेतकऱ्यांचीही मोठी वर्दळ असते. म्हणून येथे त्वरित संरक्षक भिंत बांधावी, अशी मागणी सारंगखेडा, पुसनद, कहाटूळ, कळंबू व परिसरातील शेतकरी, नागरिक व वाहनधारक करीत आहेत. या दोन्ही रस्त्यांचा सर्व्हे करताना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना याठिकाणची परिस्थिती लक्षात आली नसावी का, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.