बोरद येथे जुगार अड्डयावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 12:10 PM2020-04-16T12:10:13+5:302020-04-16T12:10:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : संचारबंदीतही जुगाराचा डाव रंगविणाऱ्यांवर तळोदा पोलिसांनी चांगलीच वक्रदृष्टी दाखविली आहे. तळोद्यात दोन ठिकाणी कारवाईनंतर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : संचारबंदीतही जुगाराचा डाव रंगविणाऱ्यांवर तळोदा पोलिसांनी चांगलीच वक्रदृष्टी दाखविली आहे. तळोद्यात दोन ठिकाणी कारवाईनंतर बोरद येथे टाकलेल्या धाडीत आठ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन लाख ४२ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटक करण्यात आलेल्यांमध्ये जिल्हा परिषदेचे माजी सभापती नरहर बळीराम ठाकरे यांचाही समावेश असल्याने खळबळ उडाली आहे.
नरहर ठाकरे रा.बोरद याच्यासह मोहन दिवल्या मोरे रा.मोड, नथ्थू एलजी पाडवी रा.बोरद, जयसिंग गुलाब ठाकरे, रा.न्यूबन, कांतिलाल रमेश भिल, विनोद इंदास पाटील, नवल सुरपत पाडवी सर्व रा.बोरद यांना ताब्यात घेण्यात आले आहे. अशोक महादू पाटील, कैलास भाईदास पाडवी व रमेश नवल ठाकरे सर्व रा.बोरद हे फरार झाले.
तळोद्याचे पोलीस निरिक्षक नितीन चव्हाण यांना बोरद येथे जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यांनी पथकासह शासकीय वाहनाने मोड गाठले. तेथून खाजगी वाहनाने ते बोरद येथे पोहचले. काही अंतर अलीकडे वाहन लावून शेतात सुरू असलेल्या जुगार अड्डयावर धाड टाकली.
यावेळी तीन जण पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून पत्ते, रोख रक्कम, मोबाईल, दुचाकी असा एकुण दोन लाख ४२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याबाबत पोलीस कर्मचारी गणेश नथ्थू सोनवणे यांनी फिर्याद दिल्याने तळोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरिक्षक नितीन चव्हाण, सहायक निरिक्षक ज्ञानेश्वर पाकळे, फौजदार अभय मोरे, प्रशांत राठोड, जमादार राजू वानखेडे, हवालदार विलास पवार, प्रकाश चौधरी, राजेंद्र साबळे, दिनेश वसावे व कर्मचाऱ्यांनी केली.