रेंजअभावी अंगणवाड्यांचे डॅशबोर्ड राहते रिकामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 12:21 PM2019-12-07T12:21:21+5:302019-12-07T12:21:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दुर्गभ भागात अंगणवाडी सेविकांना दैनंदिन अहवाल रोज आॅनलाइन सादर करण्यासाठी मोबाईल दिले, मात्र त्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दुर्गभ भागात अंगणवाडी सेविकांना दैनंदिन अहवाल रोज आॅनलाइन सादर करण्यासाठी मोबाईल दिले, मात्र त्या भागात रेंजच मिळत नसल्याने अडथळा येत आहे. रोज अहवाल सादर करीत असले तरी मोबाईल रेंजमध्ये नेल्याशिवाय अहवाल महिला व बालविकास विभागाच्या डॅशबोर्डवर दिसत नाही.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सेविकांचे पूरक पोषण आहार, बालकांचे वजन व उंची, स्तनदा माता व गरोदरमातांच्या नोंदी, मुलींच्या नोंदी, कुपोषित बालकांची माहिती, लसीकरण याचा अहवाल पूर्वी रजिस्टरमध्ये लिखित स्वरूपात ठेऊन तो महिनाअखेर महिला व बाल विकास विभागाकडे सादर करण्यात येत होता. मात्र या विभागाचे काम पेपरलेस आणि त्या-त्या दिवशी व्हावे यासाठी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांना मोबाईल उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. मोबाइलची जबाबदारी ही फोन वापरणाऱ्या त्या-त्या अंगणवाडी सेविकांवर सोपविण्यात आली.
अंगणवाड्यांचा दैनंदिन अहवाल विभागाकडे सादर करण्यासांी धडगाव व मोलगी भागातील ७२८ अंगणवाडी केंद्रांवर कार्यरत असलेल्या सेविकांना देखील देण्यात आले आहेत. परंतु दळणवळण सुविधेच्या दृष्टीने या भागाला नेहमीच सापत्नत्वाची वागणूक दिली जाते. त्यामुळे मोबाईल वाटप करतांना या मोबाईलद्वारे कामे पूर्ण होतील का? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला होता. नेहमीच मोबाईल परिक्षेत्र मिळत नसल्यामुळे उपस्थित केलेला पश्न अधिक गुंतागुंतीचा तथा सर्वाधिक चर्चेचा विषय देखील ठरत आहे.
दैनंदिन अहवाल त्या-त्या दिवशी आॅनलाइन सादर करीत असले तरी त्या भागात मोबाईल परिक्षेत्राची नुचतीच बोळवण सुरू असल्याने सर्व अंगणवाडी सेविकांचे डॅशबोर्ड रिकामेच दिसते. आॅनलाईन अहवाल सादर करण्यासाठी उपलब्ध करुन दिलेला मोबाईल रेंजमध्ये नेल्याशिवाय डॅशबोर्डवरील अहवाल अद्ययावत होत नाही. बहुतांश अंगणवाडी सेविकांचा आठवडा उलटूनही अहवाल पोहोचत नसून कोराच दिसत आहे. कधी मोबाईल रेंजमध्ये नेल्यास अनेक दिवसाचा अहवाल एकदाच डॅशबोर्डवर पोहोचत असल्याचे अंगणवाडी सेविकांमार्फत सांगण्यात येत आहे.
डॅशबोर्ड रिकामे दिसत असल्याने काही वेळा त्या-त्या अंगणवाडी सेविकांना अहवाल, माहिती अद्ययावत करण्याच्या सूचना वरिष्ठांमार्फत करण्यात येतात. त्यामुळे कदाचित वरिष्ठांना दुर्गम भागातील दळणवळण सुविधांची सुविधांबाबत फारशी जाणीव नसावी, असे म्हटले जात आहे. तर काही वेळा स्थानिक स्तरावरील वरिष्ठांकडूनच विदारक दळणवळण सुविधेची बाब निदर्शनास आणून दिली जात आहे. यावर त्वरीत उपाययोजना करण्याची मागणी आहे.
४महिला व बालविकास विभागामार्फत बालकांसह महिलांसाठी काही योजना राबविण्यात येत आहे. या योजनांचा वेळेवर लाभ मिळवून देण्यासाठी अंगणवाडी सेविकांना बालक व गरोदर मातांची माहिती वेळेवर आॅनलाईन सादर करणे गरजेचे असते. परंतु रेंजच मिळत नसल्याने लाभार्थ्यांना योजनेपासून वंचित राहावे लागण्याची शक्यता असते.
४दुर्गम भागातील बहुतांश गावांमध्ये नियमित वीज पुरवठाही केला जात नाही, त्यामुळे अंगणवाडी सेविकांना धावपळ करुनही मोबाईल चार्जिंग करता येत नाही. अहवाल टाकणे बंधनकारक असल्याने माबाईल चार्जिंगसाठी त्यांना बाजारपेठेच्या ठिकाणी अतिरिक्त खर्च सहन करीत दुकानदारांकडे हात जोडावे लागत आहे.
दुर्गम भागातील बीएसएनएलचे सर्व टॉवरला आवश्यक तेवढा वीज पुरवठा होत नाही. त्यामुळे नियमित सेवा मिळत नाही. म्हणून दूरसंचार विभागाने जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निती आयोगाकडे सौर पॅनल उपलब्ध करुन देण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. परंतु याबाबत कुठलीही हालचाली होत दिसत नसल्याने दुर्गम भाग अजुनही सौर पॅनलच्या प्रतिक्षेत आहे.