भरदिवसा घरफोडीचे सत्र सुरुच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 11:45 AM2019-12-04T11:45:58+5:302019-12-04T11:46:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा/नंदुरबार : जिल्ह्यात दिवसा घरफोडी होण्याचे सत्र सुरुच असून औरंगपूर ता़ शहादा येथे पाच तोळे सोने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा/नंदुरबार : जिल्ह्यात दिवसा घरफोडी होण्याचे सत्र सुरुच असून औरंगपूर ता़ शहादा येथे पाच तोळे सोने व सव्वा तीन लाख रुपये रोख चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना उजेडात आली आहे़ तत्पूर्वी सोमवारी पहाटेच्या सुमारास नंदुरबार शहरातील शिवाजीनगरात चोरीची घटना समोर आली होती़
औरंगपूर, ता.शहादा येथील शेतकरी नामदेव गोविंदा पाटील हे सोमवारी सकाळी लग्न समारंभानिमित्त कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. इतर ठिकाणीही हळदीचा कार्यक्रम असल्याने त्यांना रात्री परतण्यास उशिर झाला़ या संधीचा चोरट्यांनी फायदा घेत त्यांच्या राहत्या घराच्या छतावरील दरवाजाचे दार उघडून चोरट्यांनी पाठीमागील दरवाज्याचे कुलूप तोड घरात प्रवेश केला होता़ आत प्रवेश करत त्यांनी कपाट फोडून आत ठेवलेल्या ९० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या, ५४ हजाराची सोन्याची चैन, ४८ हजार रुपये रोख असा १ लाख ९२ हजार रुपयांचा ऐवज आणि घरात ठेवलेले १ लाख १५ हजार रुपये रोख असा तीन लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल घेत चोरट्यांनी पळ काढला होता़
नामदेव पाटील हे घरी परत आल्यानंतर घराचे कुलूप तुटलेले तर आतील बाजूस कपाटातील सामान अस्ताव्यस्त फेकण्यात आल्याचे दिसून आले़ घटनेनंतर रात्री उशिरा शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ मंगळवारी सकाळी येथे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह श्वानपथक आणि ठसे तज्ञ यांनी भेट देत पाहणी केली़ परंतू त्यांच्या हाती ठोस असे काहीही लागलेले नसल्याची माहिती देण्यात आली आहे़
शिवाजी नगरात घरफोडी
नंदुरबार शहरातील शिवाजी नगरात प्लॉट क्रमांक ३९ अ या घरात चोरट्यांनी प्रवेश करत कपाट फोडून ५५ हजार रुपये रोख आणि ५६ हजार ५०० रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने व कपडे असा ऐवज लंपास केला़ घरमालक पृथ्वीराज सावंत हे सोमवारी सकाळी घरी परत आल्यानंतर हा प्रकार उजेडात आला़ याबाबत पृथ्वीराज जिजाबराव सावंत यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास सहायक पोलीस निरीक्षक दिवटे करत आहेत़ घरफोडीच्या माहितीनंतर पोलीस उपअधिक्षक रमेश पवार व पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली होती़
शहरात रविवारी भरदिवसा चोरीची घटना घडल्यानंतर नागरिकांनी चिंता व्यक्त केली होती़ त्यानंतर लागलीच शिवाजी नगरातील घटना उजेडात आल्याने एकच खळबळ उडाली आहे़