रांझणीत आगीत होरपळून गाय-वासराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:32 PM2018-12-12T12:32:30+5:302018-12-12T12:32:35+5:30
एक लाखाचे नुकसान : मंगळवारी दुपारची घटना
रांझणी : रांझणी, ता.तळोदा येथे मंगळवारी शॉटसर्किटने गुरांच्या गोठय़ाला आग लागली. या आगीत गोठय़ात बांधलेल्या गायी-वासारांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. या गोठय़ा शेजारीच बांधलेल्या गाय व वासरालाही या आगीची झळ पोहोचल्याने त्यांची ही प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर पशुवैद्यकांकडून उपचार सुरू आहेत.
दरम्यान, गोठय़ात ठेवण्यात आलेली लाकडी अवजारे ही जळून खाक झाली आहेत. आग लागताच गावातील तरूणांनी सतर्कता दर्शवत अथक परिश्रमाने आग विझविण्यात यश मिळविल्याने पुढील मोठा अनर्थ टळला आहे.
याबाबत असे की, 11 रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास तळोदा तालुक्यातील रांझणी येथील जिल्हा परिषद शाळे शेजारी असलेल्या जिजाबाई संतोष मराठे यांच्या मालकीच्या जागेवर असलेल्या गोठय़ाला शॉटसर्कीटने आग लागली. या आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केल्याने क्षणार्धात संपूर्ण गोठा जळून खाक झाला.
या वेळी गोठय़ात बांधलेली जेठय़ा हांद्या राजपूत यांची एक गाय व एक वासरू होरपळून जागीच ठार झाले. तर गोठय़ा शेजारी बांधलेल्या शिवराम चिंधू पाचोरे यांच्या एका गायीला व वासरालाही या आगीची झळ पोहोचल्याने ही दोन्ही जनावरे गंभीररित्या भाजली गेल्याने त्यांच्यावर पशुधनविकास अधिकारी डॉ.विश्वास नवले, डॉ.गोस्वामी यांच्याकडून औषधोपचार सुरू आहेत.
या आगीत गोठय़ात ठेवण्यात आलेल्या लाकडी नांगर, वखर, कोळपे, जू या सारखे शेती अवजारे, चारा, ढेप तसेच तीन खाट व अंथरून-पांघरूण सारख्या संसारोपयोगी वस्तु असे अंदाजित एक लाख 22 हजार 500 रूपयांच्या वस्तू जळून खाक झाल्या आहेत. या घटनेचे वृत्त कळताच संपूर्ण गाव घटनास्थळी गोळा झाले होते. गावातील युवकांनी सतर्कता दाखवत जीव धोक्यात घालून आग विझविण्यासाठी प्रयत्न केल्याने पुढील मोठा अनर्थ टळला असल्याचे समजते. घटनास्थळी तलाठी राहूल जाधव यांनी पाहणी करून अहवाल तहसील विभागाकडे पाठविला आहे. दरम्यान सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व पोलीस पाटील यांनी ही भेट देवून घटनेविषयी माहिती जाणून घेतली.