शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील सिताबाई तडवी यांचा मृत्यू; विविध न्याय हक्कासाठी केला संघर्ष

By मुकेश चव्हाण | Published: January 28, 2021 11:14 AM2021-01-28T11:14:09+5:302021-01-28T11:14:27+5:30

मोठ्या प्रमाणात थंडी असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.  

Death of Sitabai Tadvi from Maharashtra who participated in the farmers' movement; Struggle for various justice rights | शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील सिताबाई तडवी यांचा मृत्यू; विविध न्याय हक्कासाठी केला संघर्ष

शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील सिताबाई तडवी यांचा मृत्यू; विविध न्याय हक्कासाठी केला संघर्ष

Next

नंदुरबार/ नवी दिल्ली: गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या वेशीवर केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला प्रजासत्ताकदिनी हिंसक वळण लागलं. शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मार्चवेळी अनेक भागांत हिंसाचार झाला. पोलीस आणि आंदोलक आमनेसामने आले. या प्रकरणी २२ एफआयआर नोंदवण्यात आल्या असून २०० जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. याशिवाय शेतकरी नेत्यांविरोधातही गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. याचदरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

नंदुरबार जिल्ह्यातील आंबाबारी येथील रहिवासी सिताबाई तडवी (वय 56) या १६ जानेवारीपासून दिल्लीतील शेतकरी आंदोलनासाठी दिल्लीला गेल्या होत्या. त्या 26 जानेवारीला शेतकरी आंदोलनाच्या परेडमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर रात्री दिल्लीहून नंदुरबारकडे येत होत्या. जयपूर स्टेशनला ट्रेनची प्रतीक्षा करीत असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि सकाळी ५च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. मोठ्या प्रमाणात थंडी असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.  

सिताबाई तडवी यांनी यापूर्वी देखील विविध आंदोलनात सहभाग घेतला होता. लोकसंघर्ष मोर्चाचा उलगुलांन आंदोलन, वनजमिनीचे आंदोलनमध्ये त्यांनी आदिवासींचा न्याय हक्कासाठी संघर्ष केला. त्यांच्या मृत्यूची माहिती समजताच कुटुंबावर शोककळा पसरली आहे. 

तत्पूर्वी, दिल्ली पोलीस आता सीसीटीव्ही फुटेडच्या माध्यमाने निदर्शनकर्त्यांचा शोध घेत आहे. यासाठी, लाल किल्ला, नांगलोई, मुकरबा चौक आणि सेंट्रल दिल्लीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज काढण्यासाठी स्पेशल सेल आणि क्राइम ब्रांचची मदत घेतली जात आहे. यात पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर, लाल किल्ल्यावर चढणाऱ्यांवर आणि सरकारी संपत्तीचे नुकसान करणाऱ्यांवर पोलिसांचे लक्ष असेल. याच बरोबर, ज्यां नेत्यांनी शेतकऱ्यांना भडकावले अशा नेत्यांवरही पोलिसांची नजर असणार आहे.

दरम्यान, नवीन कृषी कायद्यांविरोधात प्रजासत्ताकदिनी काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर मोर्चामध्ये झालेल्या हिंसाचाराची निवृत्त न्यायाधीशांच्या समितीतर्फे चौकशी करण्यात यावी, अशी विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात बुधवारी दाखल करण्यात आली आहे. ज्यांनी दिल्लीत हिंसाचार केला त्यांच्यावर तसेच या हिंसाचाराला जबाबदार असणाऱ्या संघटनांविरोधात गुन्हे नोंदविण्यात यावेत व कडक कारवाई करावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने द्यावा. हिंसाचार करणाऱ्यांनी तिरंगा राष्ट्रध्वजाचाही अपमान केला आहे, असा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. ही याचिका अ‍ॅड. विशाल तिवारी यांनी दाखल केली आहे.

‘तो’ ध्वज खलिस्तानचा नव्हे, तर, शीख धर्माचा

लाल किल्ल्यामध्ये घुसून आंदोलकांनी तिथला तिरंगा ध्वज उतरविला व त्याऐवजी खलिस्तानचा ध्वज फडकाविला, असा आरोप मंगळवारी झाला होता. मात्र त्यासंदर्भात समाजमाध्यमावर झळकलेल्या एका व्हिडीओत असे स्पष्ट दिसते आहे की, लाल किल्ल्यावरील तिरंगा ध्वज डौलाने फडकत असून त्याच्या शेजारी एक काठी रिकामी होती, त्यावर आंदोलकांपैकी एकाने भगव्या, पिवळ्या रंगाचे फडकविलेले ध्वज हे खलिस्तानचे नाहीत. त्यातील भगवा ध्वज शिखांचा धार्मिक ध्वज आहे. त्याला ‘निशाण साहिब’ म्हणतात.

Web Title: Death of Sitabai Tadvi from Maharashtra who participated in the farmers' movement; Struggle for various justice rights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.