योग्य भाव न मिळाल्यास पपई तोड बंद करण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 01:18 PM2020-01-25T13:18:34+5:302020-01-25T13:18:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : पपई उत्पादक संघर्ष समिती व पपई व्यापारी यांची शुक्रवारी संयुक्त बैठक शहादा तहसील कार्यालयात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : पपई उत्पादक संघर्ष समिती व पपई व्यापारी यांची शुक्रवारी संयुक्त बैठक शहादा तहसील कार्यालयात तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत पपईच्या दराबाबत योग्य तोडगा न निघाल्याने २६ जानेवारीपासून पपई तोड थांबविण्याचा निर्णय पपई उत्पादक संघर्ष समितीच्या सदस्यांनी घेतला आहे. पपईला योग्य भाव न मिळाल्यास पपई रस्त्यावर फेकू, असा निर्णयही शेतकऱ्यांनी घेतला आहे.
उत्तर भारतात व्यापारी पपई प्रती किलो ४० ते ५० रुपये दराने विक्री करीत आहेत. त्यामानाने शहादा तालुक्यातील पपई व्यापारी हे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देत नाहीत. गेल्या काही वर्षापासून अत्यल्प पावसामुळे पाण्याची पातळी खालावल्याने बागायत शेती करणे शेतकºयांना अवघड झाले आहे. परिणामी मोजकेच शेतकरी पपईची लागवड करीत होते. उत्पन्न कमी निघत असल्याने पपईला व्यापारी योग्य भाव देत होते. यंदा पावसाचे प्रमाण समाधानकारक होते म्हणून पपईचे क्षेत्र वाढून उत्पादनही वाढले आहे. सद्यस्थितीत दिल्ली, हरियाणा, जम्मू-काश्मीर आदी ठिकाणी थंडीने कहर केला आहे. त्यामुळे या भागात पपईला मागणी वाढली आहे. उत्तर भारतातील बाजारपेठेत पपईला प्रती किलो सध्या ५० रुपयांपेक्षा जास्त भाव मिळत आहे. शहादा तालुक्यात दोन महिन्यापासून व्यापाºयांनी पपईची तोड सुरू केली आहे. सुरुवातीला २२ रुपये प्रती किलो दराप्रमाणे तोड सुरू केली. मात्र नंतर दर कमी करत करत साडेसात रुपयांपर्यंत आणून ठेवल्याने होणारा विरोध पाहता पुन्हा साडेदहा रुपये किलो दराने तोड सुरू केली. परंतु पपईला किमान १४ रुपये प्रती किलो दर मिळावा, अशी शेतकºयांची मागणी आहे.
गेल्या काही दिवसापासून पपई उत्पादक शेतकरी व व्यापारी यांच्यात दराबाबत रस्सीखेच सुरू होती. त्यावर योग्य निर्णय व्हावा म्हणून शेतकरी व व्यापाºयांची शुक्रवारी सकाळी तहसील कार्यालयात तहसीलदार मिलिंद कुलकर्णी व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव हेमंत चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. बैठकीत तहसीलदार कुलकर्णी यांनी सांगितले की, शेतकºयांना कच्चामाल उत्पादन करण्याकरिता आर्थिक व मानसिक या श्रमातून जावे लागते. बºयाचवेळा पिकांसाठी लागलेला खर्चही निघत नाही. त्यामुळे व्यापारी व शेतकरी यांच्यात ‘गिव्ह अँड टेक’ याप्रमाणे व्यापार होऊन दोघांमध्ये समन्वय साधून पपई दर निश्चित केले पाहिजे. यात कुणाचेही शोषण होऊ नये, अशी समन्वयाची भूमिका असावी, असे सांगितले. परंतु शेतकºयांनी आम्हाला योग्य भाव मिळाला तरच आम्ही पपई तोड करू देऊ अन्यथा दर निश्चित न झाल्यास २६ जानेवारीपासून पपई तोड बंद करण्यात येईल, असा निर्णय पपई उत्पादक संघर्ष समितीचे भगवान पाटील, उमाकांत पाटील, हिरालाल माळी, विश्वनाथ पाटील, दिलीप पाटील, संदीप पाटील, ऋषीकेश चौधरी, राजाराम पाटील, गणेश मराठे, जयेश मराठे, मयूर पाटील, योगेश्वर पाटील, महेश सूर्यवंशी, निलेश पाटील यांच्यासह अनेक शेतकºयांनी घेतला आहे.