प्रकाशा येथे १५ जुलैपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:21 AM2021-07-15T04:21:54+5:302021-07-15T04:21:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : येथे इयत्ता आठवी ते १२ वी चे वर्ग शासनाने व शिक्षण विभागाने जारी केलेल्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : येथे इयत्ता आठवी ते १२ वी चे वर्ग शासनाने व शिक्षण विभागाने जारी केलेल्या नियमानुसार सुरू करावेत, असा निर्णय प्रकाशा येथील ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या शिक्षण, आरोग्य, महसूल व ग्रामपंचायतीच्या बैठकीत घेण्यात आला.
याबाबत असे की, प्रकाशा येथील ग्रामपंचायतीमध्ये शाळा सुरू करावी की नाही यासाठी संबंधित विभागाचा पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत इयत्ता आठवी ते १२ वीचे वर्ग सुरू करण्यासंदर्भात चर्चा होऊन ठराव करण्यात आला. या वेळी सर्वोदय विद्या मंदिर विद्यालयात आठवी ते १२ वीपर्यंतचे वर्ग आहेत ते सुरू करण्यात यावे, अशी मागणी होती. त्यानुसार बैठक घेण्यात आली. या बैठकीस सरपंच सुदाम ठाकरे, उपसरपंच भरत पाटील, ग्रामविकास अधिकारी बी.जी. पाटील, शिक्षण समितीचे सदस्य हरी पाटील, डॉ.सखाराम चौधरी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.विवेक बावस्कर, महसूल विभागाचे धर्मराज चौधरी, प्राचार्य ए.के. पटेल, उपमुख्याध्यापक डी.टी. चौधरी, पर्यवेक्षक चंद्रकांत पटेल, शिक्षक सुरेश जाधव, नरेंद्र गुरव आदी उपस्थित होते. याप्रसंगी ग्रामसेवकांनी सांगितले की, गावात १४ जूनपासून एकही कोरोना रुग्ण आढळलेला नाही. तेव्हा शाळा सुरू करण्यास हरकत नाही. तसेच आरोग्य विभागाचे डॉ.बावस्कर यांनी सांगितले की, शासनाने जारी केलेल्या नियमानुसार आपल्याला शाळा सुरू करता येईल. त्यात अगोदर शाळा निर्जंतुकीकरण करणे, आलेल्या विद्यार्थ्यांची थर्मल स्कॅनिंगद्वारे तपासणी करणे, सेल्फ डिस्टन्सिंगमध्ये बसवणे, घरूनच पाण्याची बॉटल आणणे, असे त्यांनी सांगितले. तसेच सरपंच यांनी गावात रुग्ण नसले तरी प्रत्येक विद्यार्थ्याला मास्क घालूनच शाळेत प्रवेश द्यावा, असे सांगितले.
तसेच उपसरपंच भरत पाटील, हरी पाटील यांनी सांगितले की, सर्व शिक्षकांची शाळा सुरू होण्याआधी कोरोना टेस्ट करून घ्यावी.
दरम्यान, शाळेचे प्राचार्य ए.के. पटेल यांनी शासनाने सांगितलेल्या नियमावलीनुसार शाळा सुरू करण्यात येणार आहेत.
एकंदरीत या बैठकीत पॉझिटिव्ह विचार ठेवून विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करण्यात येत आहेत. पालकांनीही आपल्या विद्यार्थ्यांना शाळेत पाठवताना योग्य त्या सूचना देत काळजी घेण्यास सांगणे.
१५ जुलैपासून आठवी ते १२ वी चे वर्ग प्रकाशा येथील सर्वोदय विद्या मंदिर विद्यालयात सुरू होत असल्याने पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.