बर्ड फ्लूच्या भीतीने अंडी व कोंबडी विक्रीत घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:23 AM2021-01-13T05:23:22+5:302021-01-13T05:23:22+5:30
नवापूर : महाराष्ट्र राज्यात बर्ड फ्लू दाखल झाल्यानंतर अंड्यांच्या दरात प्रचंड घसरण झाली आहे. नवापूर तालुक्यातील पोल्ट्रीमधील अंड्यांचे दर ...
नवापूर : महाराष्ट्र राज्यात बर्ड फ्लू दाखल झाल्यानंतर अंड्यांच्या दरात प्रचंड घसरण झाली आहे. नवापूर तालुक्यातील पोल्ट्रीमधील अंड्यांचे दर घसरले आहेत. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिक चिंतातुर झाले आहेत.
ठोक बाजारात पाच रुपये ६० पैसे प्रती नगाने अंड्यांची विक्री होत होती. आता तो दर तीन रुपयांवर आल्याने पोल्ट्री व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्याचसोबत कोंबडीच्या दरावरही परिणाम झाला आहे. दररोज दर कोसळत असून बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र पूर्ण १०० डीग्री सेल्सिअसमध्ये शिजवलेले चिकन आणि अंडी खाण्यास सुरक्षित राहतात, असे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सध्या शहरी भागातील तरुणांमध्ये अंड्यांच्या लॉरीवर हाफ फ्राय खाण्याची क्रेज आहे. परंतु सध्या राज्यात बर्ड फ्लूची लागण झाल्याने काळजी म्हणून हाफ फ्राय अंडे खाणे टाळावे, असे सेवानिवृत्त पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. विनायक गावित यांनी सांगितले.
राज्यात बर्ड फ्लूची लागण झाल्याने नवापूर तालुक्यातील अंडी व चिकन विक्रीवर प्रचंड परिणाम झाला आहे. भावातदेखील दररोज घसरण होत आहे. पूर्वीचे दर व कंसात सध्याचे दर असे : देशी कोंबडी ३५० रुपये नग (२५० रुपये), अंडीवाली कोंबडी ११० रुपये नग (६५ रुपये), बॉयलर कोंबडी १०५ रुपये किलो (८० रुपये), अंडी पाच रुपये ६० पैसे प्रती नग (तीन रुपये ४० पैसे प्रती नग).