सूक्ष्मसिंचन योजनेचे २५ टक्के अनुदान वितरित करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:36 AM2021-09-17T04:36:38+5:302021-09-17T04:36:38+5:30
नंदुरबार : प्रधानमंत्री कृषिसिंचन योजनेंतर्गत अल्प व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सूक्ष्मसिंचन व ठिबक सिंचन योजना लागू करण्यात आली आहे. या ...
नंदुरबार : प्रधानमंत्री कृषिसिंचन योजनेंतर्गत अल्प व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सूक्ष्मसिंचन व ठिबक सिंचन योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत राज्य शासनाकडून देण्यात येणारे २५ टक्के अनुदान शेतकऱ्यांना मिळालेले नाही. हे अनुदान तातडीने द्यावे, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. याविषयीचे निवेदन जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांना देण्यात आले. या निवेदनात, २०१९-२०२० यावर्षी सूक्ष्मसिंचन व ठिबक सिंचनासाठी शेतकऱ्यांना ८० टक्के अनुदान देण्यात येणार होते. यात प्रधानमंत्री कृषिसिंचनाचे ५५ टक्के अनुदान शेतकऱ्यांना एप्रिल २०२१मध्ये मिळाले आहे. परंतु, मुख्यमंत्री शाश्वत कृषिसिंचन योजनेतील २५ टक्के अनुदान अद्याप प्राप्त झालेले नाही. तब्बल २० महिन्यांपासून शेतकरी या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. हे अनुदान मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. यंदा पावसाने अल्प हजेरी लावली असल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा सामना करावा लागला आहे. दरम्यान, काही ठिकाणी आता अतिवृष्टी झाली आहे. यातूनही शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने अनुदान त्वरित वितरित करून पंचनामे करावेत तसेच पीक विमा सरसकट जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर बलराज विश्वास पाटील, भय्या धनगर, नानाभाऊ साहेबराव पाटील, योगेश दगा पाटील, कमलेश पावबा पाटील, बिजलाल नारायण पाटील, बाबूलाल कौतिक धनगर, यशवंत शिवाजी पाटील, विवेक शांताराम पाटील, प्रकाश आनंदा पाटील, मनोज रावण पाटील यांच्या सह्या आहेत.